दोन वर्षांपासून पाऊस समाधानकारक पडत असला, तरी एकामागून एक येणाऱ्या संकटांमुळे शेतकरी बेजार झाला आहे. आजच्या घडीला शेतकऱ्यांना शेती करणे परवडत नाही. म्हणून अनेक शेतकरी आवाक्याबाहेर लागत असलेल्या भांडवली खर्चामुळे आपली शेती उक्ती देताना दिसत आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे एक ते चार एकरपर्यंत शेती आहे, असे शेतकरी मोठे बागायतदार शेतकऱ्यांना एकरी १० ते १५ हजारांपर्यंत नफ्याने जमीन कसायला देत आहेत.
गेल्या १५ महिन्यांपासून कोरोना महामारीचे संकट आहे. त्यात अवकाळी पाऊस, गारपीट, चक्रीवादळ यासारखी नैसर्गिक संकटे एकामागून एक येत असल्याने अनेकवेळा शेतकऱ्यांचे शेतीसाठी लावलेले भांडवलही निघत नाही. त्यामुळे जे शेतकरी उधार-उसनवारीने पैसे घेऊन आपल्या शेतीत भांडवल लावत असतात, ते दिवसेंदिवस अधिकच कर्जबाजारी होत आहेत. रासायनिक खते, बी-बियाणे यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. मजुरांच्या टंचाईमुळे वाढलेली मजुरी, सतत उद्भवणारी बोंडअळी, वाहतुकीचा वाढलेला खर्च, जमीन मशागतीचे वाढलेले दर, उत्पन्नात झालेली घट यासारख्या असंख्य समस्यांना सध्या शेतकरी तोंड देत आहेत. त्यामुळे हताश होऊन अनेक सामान्य शेतकरी आपली जमीन मोठ्या बागायतदार शेतकऱ्यांना एक-दोन वर्षांच्या बोलीवर नफ्याने कसण्यासाठी देत आहेत. पूर्वी जे नोकरदार शेतकरी बाहेरगावी नोकरीस होते, तेच आपली जमीन उक्ती देत होते. मात्र आता वर्षानुवर्षे शेती करणारा सधन शेतकरीही शेतीमध्ये येत असलेल्या असंख्य अडचणी तसेच भांडवली खर्च परवडत नसल्यामुळे आपली जमीन निम्मी बटाई किंवा उक्ती कसण्यासाठी देत असल्याचे दिसून येत आहे.
कोरोना काळात अनेक वस्तूंची भाववाढ झाली आहे. कोरोनापासून लोकांचा बचाव व्हावा, म्हणून शासनाने अनेकदा कडक निर्बंध तसेच संचारबंदी लागू केली. याचा फायदा सर्व व्यापारी तसेच अनेक व्यावसायिकांना झाला. संचारबंदीमळे किराणा मालाचे भाव गगनाला भिडले आहेत. शेतीयोग्य वस्तू यामध्ये बी-बियाणे, रासायनिक खते, अवजारे यासारख्या गोष्टींचे भाव वाढतच आहेत. शेतकऱ्यांचा माल बाजारपेठेत घेऊन जायचा असेल, तर कोरोनाच्या नावाखाली वाहतुकीचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. कोरोना काळात घर बांधण्यासाठी लागणारे वीट, सिमेंट, सळी या साहित्याचेही दर वाढले आहेत. कारागीरांची मजुरीही वाढली आहे. हार्डवेअरच्या वस्तू, नवी मोटारसायकल अशा अनेक गोष्टी असतील की, त्यांचे भाव वाढले. मात्र शेतकऱ्यांचे नशीब असे आहे की, आयुष्यभर राबराब राबून दुसऱ्याच्या तोंडात अन्नाचा घास भरविणारा आज चोहोबाजूंनी संकटात सापडला आहे आणि त्याच्याच मालाला भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाला असून, कर्जबाजारीपणामुळे त्याला शेती करणे नकोसे वाटत असल्याने तो सध्या जमीन दुसऱ्या शेतकऱ्याला निम्मी बटाई अथवा उक्ती देणे पसंत करीत आहे.