गेल्या वर्षीच्या तुलनेत कोरोनाची दुसरी लाट अतिशय भयंकर आहे. यात मृत्यूचे प्रमाणही जास्त आहे. ऐन परीक्षेच्या कालावधीतच कोरोनाचा संसर्ग वाढल्याने, विद्यार्थ्यांना कोणताही धोका पोहोचू नये या दृष्टिकोनातून सीबीएसईच्या धर्तीवर राज्य शिक्षण मंडळाने दहावीची बोर्डाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाबाबत अजूनही संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे. मात्र, शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य दिलेले आहे.
दरम्यान, परीक्षा रद्द झाल्या, परंतु निकाल कसा लावणार, असा प्रश्न निर्माण झालेला होता. आता त्यावरही तोडगा काढण्यात आला आहे. जिल्ह्यात दहावीला २९ हजार ५८५ विद्यार्थी प्रविष्ट झालेले होते. त्यात १६ हजार ६२२ विद्यार्थी व १२ हजार ९६३ विद्यार्थिनी आहेत. हे सर्व विद्यार्थी आता ११वीत प्रवेशित झाले आहेत. त्यामुळे सर्वच शाळांचा निकाल १०० टक्के लागणार आहे.
असे आहे निकालाचे सूत्र
राज्य शिक्षण विभागाने दहावीच्या निकालाचे सूत्र जाहीर केले आहे. त्यानुसार नववीतील गुणांचे ५० टक्के आणि दहावीतील अंतर्गत मूल्यमापन गुणांचे ५० टक्के वापरून दहावीचा अंतिम निकाल जाहीर करण्यात येईल. दहावीच्या अंतर्गत मूल्यमापन करताना विद्यार्थ्याच्या दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापनाला ३० गुण, तर गृहपाठ, तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा यांच्या आधारे २० गुण दिले जाणार आहेत.
विद्यार्थी खूश !
दहावीच्या परीक्षेची गेल्या वर्षभरापासून तयारी केली होती. चांगले गुण मिळतील असा विश्वास होता. मात्र, कोरोनामुळे परीक्षा रद्द झाल्याने थोडी नाराजी असली तरी पुढील वर्गात प्रवेश मिळत असल्याचा आनंद असल्याचे संजीव पाटील याने सांगितले.
परीक्षा होणे गरजेचे होते. आता परीक्षा नसली तरी उत्तीर्ण होत असून, कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश मिळेल याचा मनस्वी आनंद असल्याचे दीपक बठेजा याने सांगितले.
राज्य शासनाने विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यायला पाहिजे होती. आता नववी व दहावीच्या गुणांच्या आधारे मूल्यमापन होणार आहे. राज्य शासनाने विचारांती हा निर्णय घेतला असून, तो विद्यार्थ्यांच्या हिताचा आहे.
- एन. एम. जोशी,
शिक्षणतज्ज्ञ
परीक्षा घेतल्यानंतरच विद्यार्थ्याची खरी गुणवत्ता समजत असते. आता नववीच्या गुणांच्या आधारावर दहावीचे मूल्यमापन कसे शक्य आहे. हा एक प्रकारे हुशार विद्यार्थ्यांवर अन्यायच आहे. त्यामुळे परीक्षा घ्यायलाच पाहिजे.
- शामकांत पाटील
पालक
बारावीची परीक्षा होणार आहे? तर मग दहावीची परीक्षा घेण्यात काय अडचण आहे? परीक्षा न घेणे हा विद्यार्थ्यांवरच अन्याय आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होणारच नाही. परीक्षा न घेण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे.
- अनिल परदेशी
पालक
पुढील प्रवेशाचे काय?
अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटी घेण्याचा राज्य शासनाचा विचार आहे. मात्र, या धोरणानुसार विविध शाखांना कसा प्रवेश मिळणार याची पालकांना चिंता आहे.