धुळे : हरियाणा राज्यातील विलासपूर येथून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरमधील शाम्पू, मोबाइलसह विविध वस्तू चालकासह साथीदाराने परस्पर लांबविल्या. डिजिटल लॉक असतानाही ते तोडून दोघांनी शिताफीने हे कृत्य केल्याचे धुळे तालुक्यातील नगाव शिवारात उघड झाले. २० ऑक्टोबर रोजी घडलेल्या या घटनेची पश्चिम देवपूर पोलिसात सोमवारी मध्यरात्री चोरीचा गुन्हा दाखल झाला. इन्स्टटेंट ट्रान्सपोर्ट सोल्युशन प्रा. लि. कंपनीचे फिल्ड मॅनेजर खालेद हमद शेख (रा. जालना) यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, २० ऑक्टोबर रोजी मोहम्मद खान अहमद खान (रा. अलवर, राजस्थान) आणि आसिफ जब्बार (रा. पलवर, हरियाणा) या दाेघांच्या ताब्यात इन्स्टटेंट ट्रान्सपोर्ट सोल्युशन प्रा. लि. कंपनीने ७९ लाख ३३ हजार १७१ रुपयांचा ऐवज पुणे येथे डिलिव्हरी करण्यासाठी दिलेला होता.
या कंटेनरला डिजिटल लॉक करण्यात आले होते. हे डिजिटल लॉक तोडून दोघांनी संगनमत केले आणि कंटेनरमधील ऐवज चोरून पलायन केले. चोरी गेलेल्या वस्तूंमध्ये शाम्पूच्या पुड्या, विविध कंपन्यांचे मोबाइल, फेसवाॅश, पक्षी खाद्य, दिवाळी आणि दसरा डेकोरेशनचे साहित्य असा एकूण ७९ लाख ३३ हजार १७१ रुपयांचा ऐवज दोघांनी लंपास केला. चोरीचा हा प्रकार धुळे तालुक्यातील नगाव शिवारात रामदेवबाबा रायका ढाब्याजवळ २० ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडला. चोरट्यांचा शोध घेऊनही उपयोग झाला नाही. याप्रकरणी साेमवारी मध्यरात्री दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक संगीता राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.