धुळे - जिल्ह्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी हजर नसतात, औषधी मिळत नाही, मिळाली तर ती कालबाह्य झालेली असतात अशा असंख्य तक्रारी सदस्यांनी करून आरोग्य यंत्रणेचे वाभाडे काढले. दरम्यान यावर्षी कमी प्रमाणात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला पीक विम्याचा लाभ मिळाला पाहिजे असा ठराव करण्यात आला. यासह शिक्षण, समाजकल्याण विभागावरही सभेच चर्चा झाली.
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात अध्यक्षा अश्विनी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बोरकुंड आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी कधीच थांबत नाही. रूग्णांचा केस पेपर काढला जात नाही. औषधीही मिळत नाही. आरोग्य केंद्रात स्वच्छताही नसते. यावेळी आरोग्य अधिकारी डॅा. स्वप्नील बोडके यांनी बोरकुंड प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकरी असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला असता, सर्व अधिकारी, कर्मचारी कागदावरच आहेत.मात्र काम काेणीच करीत नसल्याचे सदस्यांनी सांगितले.