धुळे :जळगाव जिल्ह्यातील कजगाव (ता.भडगाव) येथे दराेडा टाकण्याच्या तयारीने निघालेल्या गुंडांच्या टोळीला मोहाडी पोलिसांनी रविवारी रात्री गरताड बारीजवळ पकडले. त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस, कटर मशीन, मिरचीची पूड व कार, दुचाकी असा एकूण १ लाख ८४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
मोहाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या चाळीसगाव रोडवरील गरताडबारीजवळ काही संशयित तरुण पोलिसांना दिसले. पोलिसांनी त्या तरुणांना घेरले व त्यांच्या वाहनाची तपासणी केली असता, त्यात एक गावठी कट्टा, एक जिवंत काडतूस, दोन कटर मशीन, स्क्रू ड्रायव्हर, पकड, लोखंडी टॅामी, मिरचीची पूड, पेट्रोल कॅन यासह एमएच १५-बीडी ५८३१ क्रमांकाची कार व एमएच १९-सीसी ७६५३ क्रमांकाची दुचाकी असा एकूण १ लाख ८४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही टोळी कजगाव (ता. भडगाव) येथे दरोडा टाकण्यासाठी निघालेली होती.
याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस नाईक देवेंद्र ठाकूर यांनी मोहाडी पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून राजबीरसिंग मिलनसिंग भादा (वय १८, रा. दंडेवालेबाबानगर, मोहाडी, धुळे) यांच्यासह पाच जणांना गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक एस.एस. काळे करीत आहेत.