धुळे : सापळा लावून चारचाकी वाहनातून मालेगावच्या दिशेने जाणारा सव्वादोन लाखांचा गुटखा आणि ५ लाखांचे वाहन असा मुद्देमाल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. ही कारवाई नगाव शिवारात मंगळवारी सायंकाळी झाली. याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात वाहन चालक शाहरुख खान नसीरखान (वय २८) याला अटक करण्यात आली.
सोनगीरकडून एक चारचाकी वाहन धुळेमार्गे मालेगावच्या दिशेने जाणार असून त्यात गुटखासदृश पदार्थ लपविलेला आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. माहिती मिळताच मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर नगाव शिवारात हॉटेल साईकिशन समोर पोलिसांनी सापळा लावला. सोनगीरकडून येणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू करण्यात आली. एमएच ३१ सीआर ६२९६ क्रमांकाचे चारचाकी वाहन येताच अडविण्यात आले.
चालकाकडे विचारणा केली असता उडवा-उडवीची उत्तरे मिळाली. पोलिसांना संशय आल्याने चालकासह वाहन ताब्यात घेण्यात आले. वाहनाची तपासणी केली असता त्यात २ लाख १५ हजार ७२० रुपयांच्या गुटख्याचा साठा लपविलेल्या अवस्थेत आढळून आला. हा सर्व साठा पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी ५ वाजता करण्यात आली.
याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस कर्मचारी हर्षल शांताराम चौधरी यांनी पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, वाहन चालक शाहरुख खान नसीरखान (वय २८, रा. मालेगाव, जि. नाशिक) याला अटक करण्यात आली. विविध कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक अमरजित मोरे घटनेचा तपास करीत आहेत.