धुळे : शिक्षिकेकडून एक हजार रुपयांची लाच घेताना धुळे तालुक्यातील कुसुंबा येथील साेशल ॲण्ड कल्चरल असाेसिएशन संचालित आदर्श हायस्कूलच्या मुख्याध्यापकाला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास मुख्याध्यापकाच्या दालनातच करण्यात आली. प्रदीप पुंडलिक परदेशी (वय ५७, रा. कुसुंबा, ता. धुळे) असे ताब्यात घेतलेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. या प्रकरणी धुळे तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आदर्श हायस्कूलमध्ये एका उपक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यासाठी आलेला खर्च सर्वांनी मिळून करायचा आणि शिक्षकांकडून प्रत्येकी एक हजार तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून ८०० रुपये जमा करण्याचे बैठकीत ठरले हाेते. मात्र, हजार रुपये देण्यास एका शिक्षिकेने विरोध दर्शविला. त्यामुळे पैसे दिले जात नाहीत ताेपावेताे हजेरी मस्टरवर स्वाक्षरी करण्यास मज्जाव करण्यात आला. त्यामुळे संबंधित शिक्षिकेने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे कार्यालयाकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणी करीत एसीबीने ट्रॅप लावला. मंगळवारी मुख्याध्यापक प्रदीप परदेशी हे स्वत:च्या दालनात एक हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले गेले. त्यांना ताब्यात घेत तालुका पाेलिस ठाण्यात गुन्हा नाेंदविण्यात आला.