देवेंद्र पाठक, धुळे : शहरातील वाढत्या लोकसंख्येबरोबरच वसाहती, व्यापारी संकुलाची संख्या वाढत आहे. व्यापारी-व्यावसायिक सर्वसामान्यांपेक्षा मोठमोठे व्यावसायिकांचे जाळे वाढत आहे. अशा काही व्यापाऱ्यांकडून व्यवसायासाठीचा गाळा जेवढा आहे, त्याहीपेक्षा दुपटीने अतिक्रमण गाळ्यासमोरील रस्त्यावर करून दुकानाचे साहित्य रस्त्यावरच मांडले जात आहे. याचा परिणाम वाहतुकीसाठी अडथळा ठरत असल्याने याकडे महापालिका, पोलिस विभाग लक्ष देईल का असा प्रश्न सर्वसामान्य जनता विचारत आहे.
शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या पाचकंदीलसह आग्रा रोड हा व्यवसायाचा केंद्रबिंदू आहे. सर्वांचाच ओढा या भागात येऊन खरेदी करण्याकडे असतो. याशिवाय रस्त्यांची लांबी-रुंदी देखील तितकीच आहे. त्यात बदल न होता वाहनांची संख्या वाढत आहे. दुकानाचा गाळा हा असताना त्यातील विक्रीला असणारा माल हा बिनधास्तपणे बाहेर आणला जातो. ग्राहकांनाही आकर्षित करण्याचा काही व्यावसायिकांचा प्रयत्न असतो. त्याठिकाणी वस्तू घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची वाहने तेथून पुढे लावली जात असल्याने त्यांची वाहने पर्यायाने रस्त्यावर येतात. ती इतर वाहनधारकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहेत. अशीच परिस्थिती ही दत्तमंदिर, नेहरू चौक, वाडीभोकर रोड, साक्री रोडसह विविध ठिकाणी कमी अधिक प्रमाणावर सारखीच आहे.
लोकसंख्येच्या तुलनेने शहराचा विस्तार वाढत आहे. वर्दळ दिवसेंदिवस वाढत आहे. डेव्हलपर्सकडून ठिकठिकाणी व्यापारी संकुले तयार केली जात आहे. शहराच्या विस्ताराच्या दृष्टीने शहर विकसित होत असल्याने ही आनंदाची बाब आहे. मात्र शहराच्या विस्ताराबरोबरच शहरातील वर्दळ आणि वाहतुकीचा विचार होणे गरजेचे आहे. व्यापारी गाळेधारकांकडून व्यापारी, व्यावसायिकांनी मोठमोठ्या अनामत रकमा घेऊन, मोठ्या रकमेचे भाडे आकारून गाळे दिले जात आहे. मात्र त्या व्यापाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे वाहतुकीस अथवा रहदारीस अडचणी ठरणार नाही, याबाबत सूचना दिल्या जात नाही. दरमहा मिळणारे भाडे आणि वेळेवर मिळणे याकडे लक्ष दिले जाते. व्यापारी, गाळेधारकांना पार्किंगची सोय नाही. व्यापाऱ्यांकडे येणाऱ्या ग्राहकांना वाहने लावण्याची जागा नाही.
एवढेच काय, अनेक व्यावसायिक दुकानात असलेल्या मालापेक्षा दुप्पट माल सरळ भररस्त्यावर रचून ठेवत असल्याने अर्धा रस्ता काबीज करून घेत आहेत. परिणामी वाहतुकीस अडचण निर्माण झालेली आहे. त्यातच रस्त्यावर मनाला पटेल तेथे हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्या लहान व्यावसायिकांची दुकाने असतात. हातगाडीमुळे अडथळा ठरतो. हे दिसत असताना सुद्धा प्रशासनाची डोळेझाक आहे. त्यांना हटकले जात नाही.