धुळे : तालुक्यातील दोंदवाड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पटसंख्या मोठ्या प्रमाणात असताना एक शिक्षक कमी आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होत असून शाळेला कायमस्वरूपी शिक्षक मिळावा या मागणीसाठी दोंदवाड येथील ग्रामस्थ, ग्रामपंचायतचे पदाधिकाऱ्यांसह विद्यार्थ्यांनी ही जिल्हा परिषेदतच शाळा भरवली. ग्रामस्थांनी शिक्षकासंदर्भातील कैफियत मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांच्या कानावर घातली.
दरम्यान विद्यार्थी जिल्हा परिषदे पोहचताच शिक्षण विभागानेही गतिमान हालचाली करून या शाळेवर एका शिक्षकाची तात्पुरती नेमणूक केल्याने,ग्रामस्थांसह विद्यार्थी माघारी परतले. धुळे तालुक्यातील दोंदवाड येथे जिल्हा परिषदेची पहिली ते चौथीपर्यंतची शाळा आहे. शाळेत पटसंख्या ७२ एवढी आहे. या शाळेत तीन शिक्षकांची नियुक्ती करण्यत आलेली आहे. मात्र या शाळेतील एक शिक्षिका जयश्री दाभाडे यांची धाराशिव डायट येथे डेप्युटेशनवर नियुक्ती करण्यात आलेली आहे.
शाळेला तिसरा शिक्षक मिळावा या मागणीसाठी भर उन्हात दोंदवाड येथील काही ग्रामस्थ, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व सुमारे ४५ विद्यार्थी जिल्हा परिषदेत धडकले. त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांची भेट घेत शाळेची कैफियत मांडली. अखेर नंदाळे बुद्रक येथील संजय पाटील यांची दोंदवाडे शाळेवर तात्पुरती नियुक्ती करून अखेर या प्रश्नावर पडदा पडला.