धुळे: मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर नगाव शिवारात खताचे दुकान फोडून चोरट्याने १ लाख रुपये किमतीचा खतसाठा लांबविला. ही घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. धुळे तालुक्यातील नगाव येथील माऊली ॲग्रो सर्व्हिसेस हे दुकान महेश राजेंद्र पाटील (३२) यांचे आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील सावरीया मार्बलशेजारी माऊली ॲग्रो सर्व्हिस नावाचे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडले.
या दुकानातील ५४ हजार ५९२ रुपये किमतीची राशी, ६४ गोण्या, २५ हजार रुपये किमतीची ३० गोण्या, २५ हजार रुपयांची रोकड तसेच २ हजारांचे सीसीटीव्ही कॅमेरे असा एकूण १ लाख ७ हजार १९२ रुपयांचा ऐवज चोरून नेला. चोरीची ही घटना रविवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. सकाळी नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी आल्यानंतर चोरी झाल्याचा प्रकार लक्षात आला. याप्रकरणी बुधवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास फिर्याद दाखल झाली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चाेरट्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पीएसआय ज्ञानेश्वर चव्हाण करीत आहेत.