राजेंद्र शर्मा
धुळे : हरण्यामाळ तलाव परिसरात एका तरुणाला मारहाण करून त्याच्याकडील रोख रकमेसह दागिने घेऊन पोबारा करणाऱ्या तिघांपैकी एकाला सांगितलेल्या वर्णनानुसार पकडण्यात आले. ही कारवाई धुळे तालुका पोलिसांनी गुरुवारी केली असून २४ तासात जबरी चोरी प्रकरणाचा उलगडा करण्यात आला आहे. ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशयित दोघे फरार आहेत.
धुळे तालुक्यातील मुकटी येथील अमोल दिनकर पाटील (वय २१) हा तरुण मंगळवारी दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास हरण्यामाळ तलाव परिसरात फिरण्यासाठी आलेला होता. याठिकाणी कोणीही नसल्याची संधी तिघांनी साधली आणि त्याला अडवून मारहाण करत त्याच्याजवळ असलेल्या १ हजार रुपयांच्या रोकडसह मोबाइल आणि आईचे मोड करण्यासाठी आणलेले सोन्याचे मंगळसूत्र असा ४३ हजारांचा ऐवज लुटून घेतल्याने धुळे तालुका पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता.
तपास सुरू असतानाच तरुणाने सांगितलेल्या वर्णनानुसार आणि गोपनीय माहितीच्या आधारावर विशाल वामन मालचे (वय २३, रा. अष्टकाेणी ओटा, नगावबारी, धुळे) याला अटक करण्यात आली. त्याची चौकशी केली असता त्याने दोन साथीदारांच्या मदतीने जबरी चोरी केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. विशालकडून दागिने, रोख रकमेसह मोबाइल असा ४३ हजाराचा ऐवज जप्त केला आहे. फरार झालेल्या दोन साथीदारांचा शोध धुळे तालुका पोलीस घेत आहेत.
पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपअधीक्षक साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे व त्यांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक अनिल महाजन, महिला पोलिस उपनिरीक्षक राजश्री पाटील, कर्मचारी राकेश मोरे, रवींद्र सोनवणे, अमोल कापसे, कुणाल शिंगाणे, धीरज सांगळे, कांतीलाल शिरसाठ, प्रमोद पाटील, नितीन दिवसे यांनी गुन्ह्यांचा तपास केला.