धुळे : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने भविष्यात धुळे जिल्ह्याला ६० लाख लीटर आॅक्सिजनची आवश्यकता भासू शकते, आ निष्कर्ष जिल्हा प्रशासनाने काढला आहे. त्यामुळे पुरेशा आॅक्सिजनच्या नियोजनासाठी अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्तांची जिल्हास्तरावरील समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी आरोग्य विभाग आणि प्रशासनाच्या संयुक्त बैठकीत आॅक्सिजनयुक्त बेड, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आॅक्सिजन टँक, प्रयोगशाळेसाठी आवश्यक मनुष्यबळ, बेड उपलब्धतेसाठी तयार केलेल्या मोबाईलचा वापर आदी विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यापैकी बहुतांश रुग्णांना आॅक्सिजनची आवश्यकता भासत आहे. हीच परिस्थिती राहिली, तर धुळे जिल्ह्याला दररोज किमान ६० लाख लिटर आॅक्सिजनची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे आॅक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध राहील, असे नियोजन करतानाच पर्यायी व्यवस्था तयार ठेवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी आरोग्य विभागाला दिले.कोरोना विषाणूच्या रुग्णांसाठी आॅक्सिजन महत्वाचा असून त्याचा पुरवठा नियमितपणे होईल, अशी दक्षता घेतली पाहिजे. आरोग्य यंत्रणेने डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर येथे आॅक्सिजन समन्वयक अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. आॅक्सिजन सिलिंडर रिकामे झाल्यानंतर ते भरून घेण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी. याशिवाय ज्यांच्याकडे सिलिंडर पडून असतील त्यांच्याकडूनही सिलिंडर तातडीने मागवून घेत ते भरून ठेवावेत.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने आॅक्सिजन टँकची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. कोरोना विषाणूबाधित संशयित रुग्णांचे स्वॅब घेतल्यानंतर अहवाल येईपर्यंत त्यांना अलगीकरण कक्षातच ठेवावे. तसेच स्वॅब घेणाºया अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सत्र आयोजित करावे. बाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले असून मृत्यूदरही वाढला आहे. त्यामुळे मृत्यूदर कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने कठोर उपाययोजना कराव्यात, असेही निर्देश जिल्हाधिकाºयांनी दिले.बैठकीला महानगरपालिकेचे आयुक्त अजिज शेख, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपजिल्हाधिकारी श्रीकुमार चिंचकर (नोडल अधिकारी), जिल्हा नियोजन अधिकारी मुरलीनाथ वाडेकर, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. मनीष पाटील, महानगरपालिकेचे उपायुक्त गणेश गिरी, जवाहर मेडिकल फाऊंडेशनच्या डॉ. ममता पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. दीपक शेजवळ आदी उपस्थित होते.
... तर ६० लाख लीटर आॅक्सिजनची आवश्यकता भासेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 9:36 PM