शहरातील मच्छीबाजार चौकातील मोहम्मदीया हॉटेलमध्ये एक विधी संघर्षित बालक बसलेला असून त्याच्याजवळ एक पोते आहे़ त्याच्यात चोरीच्या वस्तू असल्याचा संशय आहे अशी गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळाली़ माहिती मिळताच त्या हॉटेलच्या परिसरात सापळा लावण्यात आला़ त्या बालकाला ताब्यात घेण्यात आले़ त्याची चौकशी आणि पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली देत आपल्या साथीदाराचे नाव सांगितले़ लागलीच पथकाने मिनाज मोहम्मद रमजान अन्सारी (२२, रा़ ८० फुटी रोड, नटराज टॉकीजजवळ, धुळे) याला अटक करण्यात आली़ त्या दोघांनी मिळून नकाणे गाव आणि बिलाडी रोड भागात चोरी करून या तांब्या-पितळाची भांडी, सोन्या-चांदीचे दागिने चोरून आणल्याचे सांगितले़ त्यांच्याजवळून ५५ हजार २१० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, ३ हजार ६५० रुपये किमतीचे तांबे पितळाची भांडे, ३० हजार रुपये किमतीची दुचाकी असा एकूण ८८ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला़ दोन ठिकाणी केलेल्या चोरीची नोंद पोलीस ठाण्यात आहे़
पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुशांत वळवी, कर्मचारी रफिक पठाण, श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, संदीप थोरात, प्रकाश सोनार, संदीप सरग, गौतम सपकाळे, राहुल सानप, सागर शिर्के, दीपक पाटील यांनी ही कारवाई केली आहे़