धुळे : बसमध्ये चढताना पॅन्टच्या खिशातून ५० हजार रुपये रोख आणि १० हजाराचा मोबाईल असा एकूण ६० हजाराचा ऐवज चोरट्याने शिताफिने लंपास केल्याची घटना धुळे बसस्थानकात शनिवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली.याप्रकरणी सायंकाळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. देवपुरातील श्रेयश कॉलनीत राहणारे सुनील नारायण देवरे आणि त्यांची पत्नी स्वाती हे दोघे पाचोरा येथे जाण्यासाठी धुळे बसस्थानकात आले. स्वाती यांची आईची तब्येत बरी नसल्यामुळे त्यांना देण्यासाठी रोख ५० हजार रुपये सुनील देवरे यांच्या खिशात ठेवलेले होते. पॅन्टच्या त्याच खिशात त्यांचा १० हजार रुपये किंमतीचा मोबाईल देखील होता. मुक्ताईनगर बसमध्ये सुरुवातीला ते चढल्यानंतर पत्नी स्वातीला फोन लावण्यासाठी त्यांनी मोबाईल शोधला, पण तो मिळून आला नाही. शिवाय खिशातून ५० हजार रुपये देखील लंपास झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. शोधा शोध करुनही त्याचा उपयोग झाला नाही. याप्रकरणी सुनील नारायण देवरे यांनी शहर पोलीस ठाण्यात सायंकाळी फिर्याद दाखल केली.
धुळ्यातील बसमध्ये चढताना चोरट्याची हातसफाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 10:01 PM