देवेंद्र पाठक,धुळे : चोरट्याने आता घरासोबतच शेतातील पिकांकडेसुद्धा आता लक्ष केंद्रित केल्याचे कावठे येथील शेतमालाच्या चोरीवरून समोर आले आहे. सोयाबीन, मूग, गहू, बाजरी, मका असा एकूण १ लाख ७९ हजारांचा ऐवज चोरट्याने लांबविला. ही घटना मंगळवारी सायंकाळी ५ ते बुधवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी साक्री पोलिस ठाण्यात बुधवारी दुपारी घरफोडीचा गुन्हा दाखल झाला.
साक्री येथील व्यापारी अनिल पोपटराव गांगुर्डे (वय ४२, रा. सावरकरनगर) यांची कावठे गावशिवारात शेती आहे. शेतात पिकविलेला शेती माल त्यांनी गोपल ट्रेडर्स नावाच्या शेतातील बंद तार कंपाउंडमध्ये जाळीत ठेवलेला होता.
शेतशिवारात कोणीही नसल्याची संधी चोरट्याने साधली. तार कंपाउंड तोडून आतमध्ये प्रवेश करत चोरट्याने २५ हजार रुपये किमतीचा मूग, ८० हजार रुपये किमतीचा साेयाबीन, २५ हजार रुपये किमतीचा गहू, १५ हजार रुपये किमतीची बाजरी, १० हजार रुपये किमतीचा मका, १२ हजार रुपये किमतीची कुळीद, १२ हजार रुपये किमतीचा हरभरा असा एकूण १ लाख ७९ हजार रुपये किमतीचा शेतमाल चोरट्याने शिताफीने लांबविला. नेहमीप्रमाणे सकाळी शेतात आल्यानंतर ठेवलेला शेतमाल त्यांना आढळून आला नाही. त्यामुळे शेत मालाची चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. ही बाब त्यांनी गांभीर्याने घेऊन साक्री पोलिस ठाणे गाठले आणि फिर्याद दाखल केली. त्यानुसार, बुधवारी दुपारी अडीच वाजता भादंवि कलम ३८०, ४६१ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक जी.एस. कोळी करीत आहेत.