धुळे: दोन बनावटीची पिस्तुले, ५ जिवंत काडतुसे आणि मोबाइल असा ७५ हजारांचा मुद्देमाल शिरपूर पोलिसांनी एकाकडून जप्त केला. ही कारवाई ३१ डिसेंबर रोजी रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास करण्यात आली. प्रयागसिंह देविसिंह जोधा (वय २७, रा. राजस्थान) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. शिरपूर येथील गुजराथी कॉम्पलेक्स येथील नवकार ट्रॅव्हल्स ऑफिसच्या समोर हनुमान व्यायाम शाळेच्या प्रवेशद्वाराजवळील रस्त्यावर एक तरुण उभा असून त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पथकाने घटनास्थळी येऊन सापळा लावला.
मिळालेल्या माहितीनुसार तरुणाकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांना संशय आल्याने तरुणाला ताब्यात घेण्यात आले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे गावठी बनावटीची दोन पिस्तुले, ५ जिवंत काडतुसे आणि १ मोबाइल असा एकूण ७५ हजारांचा मुद्देमाल आढळून आला. ही कारवाई ३१ डिसेंबर रोजी रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिस कर्मचारी विवेकानंद विश्वास जाधव यांनी रात्री १० वाजता शिरपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, प्रयागसिंह देविसिंह जोधा (वय २७, रा. बुरुजगड, ता. फलसुंड, जि. जैसलमेर, राजस्थान) याला अटक करण्यात आली. त्याच्या विरोधात शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३ चे उल्लंघन २५ व महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३७ - १३ चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक संदीप दरवडे घटनेचा तपास करीत आहेत.