धुळे:
ग्रामपंचायत निवडणुकीत उपसरपंच झाल्याच्या कारणावरून शिंदखेडा तालुक्यातील रामी येथील महिला उपसरपंचाला आठ ते दहा जणांनी शिविगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना सोमवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयासमोर घडली. याप्रकरणी मंगळवारी १० जणांविरूद्ध दोंडाईचा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२०२२-२३ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत तेजस्विनी बापू कोळी (वय २७, रा. रामी) या रामी (ता. शिंदखेडा) गावाच्या उपसरपंच झाल्या. महिला उपसरपंच झाल्याचा राग मनात ठेवून संशयितांनी उपसरपंच कोळी यांची २७ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास गाडी अडवली. संशयितांनी उपसरपंचास शिविगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच गाडीतील एका साक्षीदाराला गाडीतून बाहेर ओढत त्याला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी तेजस्विनी कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोंडाईचा पोलिसात दहा जणांसह अन्य पाच ते सहा अशा एकूण १५ जणांविरूद्ध भादंवि कलम १४३, १४७, ३३२, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. हेड कॉन्स्टेबल मजिद शेख तपास करीत आहेत.