आॅनलाइन लोकमतनिजामपूर/बळसाणे (जि.धुळे) : साडे सात महिन्यापूर्वी बळसाणे गावाच्या नदीजवळील हनुमान मंदिरनजिक रस्त्यावर मोटारसायकल थांबवून दाम्पत्यास मारहाण करुन त्यांच्याकडून सोन्या चांदीचे दागिने लुटून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी निजामपूर पोलिसांनी नंदुरबार तालुक्यातील खोंडामळी येथील तीन तरुणांना अटक करुन त्यांच्याकडून लुटीतील सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे. तिघा संशयित आरोपींना २ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी ठोठविण्यात आली आहे.साक्री तालुक्यातील माळमाथ्यावर २१ मे २०१९ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास लोणखेडी येथील गणेश इंद्रजित गिरासे आणि त्यांच्या पत्नी विजया गणेश गिरासे हे मोटारसायकलीने दोंडाईचा मार्गे मालपूर गावी जात होते. बळसाणे गावातील नदीलजवळील हनुमान मंदिरानजीक उभे असलेल्या तीन तरुणांनी आमच्या गाडीचे पेट्रोल संपले आहे. थोडे पेट्रोल काढून द्या असा बहाणा करुन गिरासे दाम्पत्याची मोटारसायकल थांबविली. तसेच दगडाने व लाठीकाठीने मारहाण करुन विजयाबाई यांच्या गळयातील सोन्याचा नेकलेस, मोबाईल तसेच चांदीचा ब्रेसलेट, सोन्याची अंगठी असा ऐवज लुटून नेला. याप्रकरणी विजया गिरासे यांनी दिलेल्या माहितीवरुन निजामपूर पोलीस स्टेशनला २५ मे २०१९ रोजी संशयित तीन अज्ञात लोकांविरुद्ध भांदवि कलम ३९४, ३२४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्ह्याचा तपास करतांना पोलिसांना कोणताही धागादोरा सापडत नव्हता. तेव्हा पोलिसांनी लुटारुनी नेलेल्या गणेश गिरासे यांच्या मोबाईलची सीडीआर, एसडीआर माहिती जाणून घेऊन त्याप्रमाणे संशयितांना अटक करण्यासाठी नंदूबार तालुक्यातील खोडांमळी गावात सापळा रचला. गावातीलच विलास महारु भिल (वय २६ वर्ष), विक्की निळकंठ पाटील (वय २३), महेश दिलीप गुरव (वय १९) सर्व रा.खोंडामळी यांना शिताफीने अटक केली. तिघांची पोलीस चौकशी केली असता त्यांनी गिरासे दाम्पत्यांना लुटल्याची कबुली दिली. तसेच त्यांच्याकडून हिसकावून नेलेले सोन्याचे नेकलेस, मोबाईल आणि चांदाीचा ब्रेसलेट आणि सोन्याची अंगठी हा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.तिघा संशयितांना न्यायालयाने २ जानेवारीपर्यंतची पोलीस कोठडी ठोठाविली आहे. या संशयितांकडून साक्री तालुक्यासह परिसरात झालेल्या अन्य चोरी व लुटीच्या घटनेचा तपास लागण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.
दाम्पत्यास लूट प्रकरणी तीनजणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2020 11:42 AM