ऑनलाईन लोकमतधुळे, दि. 14 - शहरातील विविध भागात कार्यरत तीन अट्टल गुन्हेगारांना धुळे तालुक्यातून तीन महिन्यांकरीता तडीपार करण्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी गणेश मिसाळ यांनी दिले आहेत. पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यातर्फे या तिघांना चार जिल्ह्यांतून दोन वर्षाकरीता हद्दपार करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्या संदर्भात हे आदेश देण्यात आले. शहरातील निहाल पारस परदेशी, रा.नेहरू चौक, मेहुल दत्तात्रय चत्रे, रा.एस.टी. कॉलनी, व विजय आसाराम फुलपगारे रा.गल्ली नं.14, जुने धुळे या तिघांचा यात समावेश आहे. या तिघांविरूद्ध पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात 2014 पासून प्रत्येकी चार गुन्हे दाखल असून ते सध्या न्यायप्रविष्ठ आहेत. घरफोडी, चोरी यासारखे गुन्हे ते करीत असून या प्रवृत्तीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यांच्याविरूद्ध गुन्हे दाखल असून त्यावर प्रतिबंधक उपाययोजनाही करण्यात आल्या. परंतु या तिघांच्या वर्तनात कोणतीही सुधारणा झालेली नाही. या उलट सदर परिसरात त्यांची प्रचंड दहशत असून उघडपणे त्यांच्या विरूद्ध कोणी बोलण्यास धजत नाही. त्यांच्यापासून लोकांच्या मालमत्तेस धोका निर्माण झाला असून सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था भंग होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे स्पष्ट झाले होते.
धुळे तालुक्यातून तीन गुन्हेगार तडीपार
By admin | Published: June 14, 2017 6:21 PM