लोकमत आॅनलाईन धुळे : जिल्ह्यातील १२ पैकी आठ प्रकल्पांमध्ये मिळून पिण्यासाठी ३ हजार १४ दशलक्ष घनफूट पाण्याचे आरक्षण करण्यात आले. जिल्ह्यात यंदा पुरेशा पावसाअभावी गंभीर परिस्थिती असून त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक गावासाठी पिण्याचे पुरेसे पाणी, जनावरांसाठी पाणी व चारा, प्रत्येक गावात रोजगारासाठी किमान दोन कामे सेल्फवर राहतील, या पद्धतीने जुलै २०१९ पर्यंतचे नियोजन करावे, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्राम विकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी शुक्रवारी येथे दिले.जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात दुपारी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. उपलब्ध जलसाठ्याचा आढावा घेऊन मनपा, विविध पालिका व गावांसाठी पाण्याचे आरक्षण अंतिम करण्यात आले. जिल्ह्यात सध्या आठ मध्यम प्रकल्पांत ११ हजार ४८५ दशलक्ष घनफूट उपयुक्त (जिवंत) साठा उपलब्ध असून त्यातून हे आरक्षण करण्यात आले. उपलब्ध पाणी पुढील जुलै महिन्यापर्यंत पुरेल, त्या दृष्टीने काटेकोर नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. या बैठकीस साक्रीचे आमदार डी.एस. अहिरे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन डी., धुळे मनपा आयुक्त सुधाकर देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर, उपायुक्त रवींद्र जाधव, धुळे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता के.टी. सूर्यवंशी, जि.प.ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस.बी. पड्यार,उपकार्यकारी अभियंता एन.डी. पाटील, भूजल सर्व्हेक्षण विभागाचे कनिष्ठ भूवैज्ञानिक योगेश पाटील, महावितरणचे कार्यकारी अभियंता एन.डी.ठाकूर, न.पा. मुख्याधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हा दुष्काळी जाहीर करा; जिल्हा कॉँग्रेसची मागणी शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील चारही तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याचे सर्व निकष लागू होत आहेत. त्यामुळे साक्री तालुक्यासह जिल्हा पूर्णपणे दुष्काळी जाहीर करावा, अशा आशयाच्या मागणीचे निवेदन या टंचाई आढावा बैठकीपूर्वी जिल्हा कॉँग्रेसतर्फे जिल्हाधिकाºयांच्या दालनात पालकमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना देण्यात आले. परंतु मुख्यमंत्र्यांकडून सदृश आणि मंत्र्यांकडून अदृश दुष्काळाचे ढग दाखविले जात आहेत. मात्र संपूर्ण जिल्हा दुष्काळी जाहीर करावा व उपाययोजना प्रस्तावित करून तातडीने जिल्ह्यात लागू कराव्यात. अन्यथा जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची प्रशासनाने नोंद घ्यावी, असा इशारा आमदार कुणाल पाटील,जि.प. उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, जिल्हा बॅँक संचालक हर्षवर्धन दहिते, जि.प. उपाध्यक्ष मधुकर गर्दे, प्रभाकर चव्हाण, भगवान पाटील, बाजीराव पाटील, प्रकाश पाटील, दिलीप काकुस्ते, उत्तमराव देसले, रमेश अहिरराव आदींनी दिला.