शिंदखेडा : तालुक्यातील दराणे येथील डॉ. सतीलाल पाटील यांची ‘ड्रीमर्स ऍड डुअर्स’ ही २० हजार किलोमीटर बाईक प्रवासाची चित्तरकथा तरुणांसाठी एक विलक्षण साहस कथा ठरली आहे. सात देशांत केलेल्या मोटारसायकल मोहिमेचे वर्णन त्यांनी आपल्या पुस्तकात केले आहे. प्रवासादरम्यान आलेले अनुभव, आनंददायी क्षण तसेच आलेली संकटे त्यांनी ‘ड्रीमर्स ऍड डुअर्स’ या पुस्तकात चितारले आहेत. रोमहर्षक मोटारसायकल मोहिमेत पुणे-सिंगापूर-पुणे या प्रवासात ५८ दिवस सहभागी झालेल्या आठ साहसवीरांची कथा पुस्तकरूपाने वाचकांपुढे आली आहे. ग्रामीण भागात शिक्षण घेऊन जीवशास्र, कृषिशास्रात शास्रज्ञ म्हणून योगदानासोबतच साहसाची अनेक माईलस्टोन निर्माण करणाऱ्या सतीलालचं विविध क्षेत्रातील प्रगती प्रेरणादायी आहे.
डॉ. सतीलाल पाटील यांचे माध्यमिक शिक्षण दराणे येथील शाळेत झाले. वडील त्याच शाळेत शिपाई होते. महाविद्यालयीन शिक्षण शिंदखेडा येथील एमएचएसएस कनिष्ठ महाविद्यालयात तर महाविद्यालयीन शिक्षण एसएसव्हीपीएस कॉलेजात झाले. पेस्टिंसाइड ॲण्ड ॲग्रोकेमिकलमध्ये एमएस्सी केल्यानंतर पर्यावरणशास्रात डॉक्टरेट केली, १० वर्षं खासगी कंपनीत नोकरी करून बायोटेक्नॉलॉजीमध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू केला. विविध विषयांवर कृषिपूरक संशोधने आणि उत्पादने तयार करून आंतरराष्ट्रीय पातळीवर वीस हजार लोकांना प्रशिक्षित केले आहे.
डॉ. पाटील यांनी या व्यवसायसोबत गड, किल्लेभ्रमंती, सायकल मोहिमा, बाईक मोहिम या आपल्या आवडत्या छंदालाही जपले आहे. पुण्याच्या आठ बाईकस्वरासोबत पुणे-भुतान-म्यानमार-थायलंड- बँकॉक- कंबोडिया-फुकेट-मलेशिया-सिंगापूर परत पुणे ही वीस हजार किलोमीटरची मोहीम फत्ते केली.
या मोहिमेदरम्यान विविध प्रांतात असणारी जैववैविधता, माती, यांचे नमुने परीक्षणासाठी जमा केले. दर दोनशे किलोमीटर भागात शेतकऱ्यांशी पीक परिस्थिती, हवामान याबाबतची माहिती संकलित केली. आपल्या शेतीज्ञानाचा त्या शेतकऱ्यांना काय फायदा होईल यावर चर्चासत्रे घेतली. विविध प्रांतातील जीवनमान, खाद्यपदार्थ, संस्कृती याचा क्रमबद्ध अभ्यास केला "गो ग्रीन" या मोहिमेचा सर्व अनुभव त्यांनी पुस्तकरूपाने वाचकांसमोर आणला आहे. या पुस्तकाला पुण्याचे ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांची प्रस्तावना लाभली आहे. याशिवाय ज्येष्ठ साहित्यिका वीणा गव्हाणकर याचे मार्गदर्शन लाभले आहे.
या साहस मोहिमेदरम्यान डॉ. सतीलाल पाटील यांनी भयंकर अपघाताचा अनुभवही लिहिला आहे. आपल्या ग्रीन व्हिजनच्या स्वप्नात साहसाचे मिश्रण करणाऱ्या या अवलियाचे जन्मस्थळ शिंदखेडा तालुक्यातील असल्याने शिंदखेडा येथे समवयस्क मित्र आणि शिक्षकांनी त्याचा नुकताच सत्कार घडवून आणला.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी भविष्यात सेंद्रिय शेतीबाबत विनामूल्य मार्गदर्शन करण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे.