आठवणींना उजाळादेवेंद्र पाठक । लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे मैदान आणि त्यावर होणारी सभा ही काँग्रेससाठी नेहमी फलदायी ठरली असल्याचा आजवरचा अनुभव आहे़ धुळ्यात यापुर्वी याच मैदानावर काँग्रेसच्या अध्यक्षा इंदिरा गांधी, सोनिया गांधी आणि आता धुळ्यात येणारे राहुल गांधी यांची सभा होत आहे़ साहजिकच काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे़ इंदिरा गांधीची सभाधुळे आणि नंदुरबार जिल्हा नेहमी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे़ आजवरचा इतिहास आणि धुळ्यातील एसएसव्हीपीएस कॉलेज अर्थात श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे मैदानावरील झालेल्या विविध सभांद्वारे हे चित्र प्रतिबिंबीत होत आहे़ १९७८ मध्ये राज्याचे माजी मंत्री रोहिदासदाजी पाटील हे पहिल्यांदाच मंत्री झाले होते़ त्याच काळात इंदिरा काँग्रेसची देखील स्थापना झाली होती़ पक्षाचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी स्वत: तत्कालिन काँग्रेसच्या अध्यक्षा इंदिराजी गांधी धुळ्यात आल्या होत्या़ एसएसव्हीपीएस कॉलेजचे मैदान अगदी तुडूंब भरले होते़ हेलिकॉप्टरने आलेल्या इंदिराजींनी हेलिपॅड नसल्यामुळे हेलिकॉप्टर खाली उतरवून अगदी ३ ते ४ फुटावरुन थेट खाली उडी मारली होती़ त्यानंतर सुरक्षा व्यवस्थेकडे दुर्लक्ष करुन स्वत: एकट्या गर्दीतून वाट करत व्यासपिठाकडे मार्गस्थ झाल्या होत्या़ इंदिराजींचे भाषण आणि सडेतोड बोलणे ऐकण्यासाठी धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील नागरीकांनी प्रचंड अगदी उत्स्फुर्तपणे गर्दी केली होती़ सभा आटोपल्यानंतर त्या मालेगावकडे रवाना होण्यापुर्वी त्यांनी काँग्रेस भवनात सदिच्छा भेट दिली होती़ यावेळी त्यांचे तत्कालिन खासदार चुडामणअण्णा पाटील यांच्यासह पदाधिकाºयांनी जोरदार स्वागत केले़ सोनिया गांधीची सभायाशिवाय इंदिरा गांधी यांची सून काँग्रेसच्या तत्कालिन अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देखील याच मैदानावर येऊन सभा गाजविली होती़ सडेतोड बोलणे ऐकण्यासाठी सुध्दा धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील नागरीकांनी गर्दी केली होती़ विशेष म्हणजे या मैदानावर घेण्यात आलेल्या सभेनंतर विजय हमखास झाल्याचा इतिहास आहे़ राहुल गांधीची सभाआता तीच पुनरावृत्ती काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष राहुल गांधी यांची शुक्रवारी याच मैदानावर सभा होत आहे़ त्यांच्या रुपाने गांधी परिवाराची तिसरी पिढी धुळ्यात सभा घेत असल्याचे स्पष्ट आहे़ इंदिरा गांधी नंतर आता राहुल गांधीची सभातत्कालिन काँग्रेसच्या अध्यक्षा इंदिरा गांधी यांची सभा झाल्यानंतर तब्बल ४१ वर्षाच्या कालावधीनंतर आता राहुल गांधी यांची सभा या मैदानावर होत आहे़ तसेच राजीव गांधी यांचा सोनगीरला कार्यक्रम झाला होता़ या जुन्या आठवणींना उजाळा मिळत आहे़
गांधी परिवाराच्या तिस-या पिढीची आज सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 10:55 PM