शिरपूर : नवीन ट्रॅक्टर खरेदी करून त्याची उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी करतांना ट्रॅक्टरचा उपयोग शेतीसाठी करणार अशी नोंदणी केली जाते़ त्यामुळे यासाठी आकारण्यात येणाºया करामधून सूट मिळते़ मात्र बरेच व्यावसायिक कृषीच्या नावावर ट्रॅक्टरची उचल करून त्याचा व्यावसायिक कामासाठी वापर करीत असल्याची बाब पुढे आली़ सद्यस्थितीत तालुक्यात कृषीच्या नावावर उचल केलेले शेकडो ट्रॅक्टर व्यावसायिक कामासाठी वापरले जात असल्याची बाब पुढे आली आहे़ यामुळे शासनाचा कोट्यवधी रूपयांचा महसूल बुडत आहे़शासन शेतकºयांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध योजना राबवित आहे़ यासाठी विविध योजनांचा माध्यमातून शेतकºयांना सवलत दिली जात आहे़ याचा शेतकºयांना लाभ होत आहे़ मात्र इतर कृषी योजनांप्रमाणे याही योजनांचा लाभ शेतकºयांच्या नावावर इतर लोक घेत आहेत़ तालुक्यात बहुतांशी शेतकºयांकडे शेती कामासाठी ट्रॅक्टर आहेत तर काहींनी ट्रॅक्टरची व्यावसायिक कामासाठी उचल केली आहे़ नियमानुसार कृषी कामासाठी उचल केलेल्या ट्रॅक्टरचा उपयोग हा कृषीसाठी करणे गरजचे आहे़ या ट्रॅक्टरचा व्यावसायिक कामासाठी उपयोग केल्यास त्यांच्यावर दंड आकारण्याची तरतुद आहे़ शिवाय सदर ट्रॅक्टरची नोंदणी सुध्दा रद्द करण्याची तरतुद आहे़ मात्र बºयाच लोकांकडून शेतीचा सातबारा जोडून ट्रॅक्टरची उचल करून त्याचा व्यावसायिक कामासाठी उपयोग होत आहे़ यात कंत्राटदार, बिल्डर आणि रेती माफियांचा सर्वाधिक समावेश आहे़ या प्रकारामुळे शासनाला कर स्वरूपात प्राप्त होणारा लाखो रूपयांचा महसूल बुडत आहे़ हा प्रकार मागील ४-५ वर्षापासून सुरू असून याकडे मात्र कुणाचेच लक्ष नाही़
वाळू प्रकरणी पकडलेल्या ट्रॅक्टरद्वारे बाब उघड
*रस्त्यावर धावत असलेल्या ट्रॅक्टरची उचल ही नेमकी कशासाठी केली आहे, ही बाब ट्रॅक्टरच्या कागदपत्रांची पाहणी केल्याशिवाय कळत नाही़ नेमका याच गोष्टीचा फायदा काही लोक घेत असून कृषीसाठी उचल केलेल्या ट्रॅक्टरचा व्यावसायिक कामासाठी उपयोग करीत आहे़ शिवाय त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याने त्यांना रान मोकळे असल्याचे चित्र आहे़*कृषीच्या नावावर उचल केलेल्या ट्रॅक्टरचा व्यावसायिक कामासाठी उपयोग केला जात असल्याची बाब महसून विभागाने रेतीची अवैध वाहतूक करतांना पकडलेल्या ट्रॅक्टरवरून उघडकीस आली़ पकडलेल्या ट्रॅक्टरच्या कागदपत्रांची पडताळणी केली असता त्यात सदर ट्रॅक्टरची नोंदणी ही कृषी कामासाठी केली असून त्याचा व्यावसायिक कामासाठी वापर केला जात असल्याची बाब पुढे आली़ त्यामुळे नियमानुसार या ट्रॅक्टरवर १० पट दंड आकारण्यात आला़