लोकमत न्यूज नेटवर्कदोंडाईचा : शहरातील जुना शहादा रोड व दाऊळ रस्त्यावरील रेल्वे गेटमुळे ग्रामीण जनतेची मोठी अडचण होत असून या ठिकाणी रेल्वेने पर्यायी रस्ता करावा, या मागणीसाठी सोमवारी येथील रेल्वे स्थानकावर रास्तारोको करण्यात आला. रेल्वे गेट कायमचे बंद करून अमरावती नदीच्या कोपºयाजवळ बोगदा तयार करून शहादा रोडसाठी रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मागणी करण्यात आली. ती मान्य न झाल्यास भविष्यात उग्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यााच इशारा दिला आहे. सुरत-भुसावळ रेल्वेलाईन दुहेरी झालेली असल्यामुळे हे रेल्वेगेट सतत बंद असते. तसेच दोंडाईचा रेल्वे स्टेशन गेटपासून जवळच म्हणजे रेल्वे स्टेशन व गेटचे अंतर केवळ २०० मीटर असल्यामुळे सतत रेल्वे पट्ट्यांचे काही ना काही काम सुरू असते. त्यामुळेही रेल्वे गेट बंद ठेवण्यात येते. या रस्त्यावरून रोज सुमारे २० ते २५ हजार लोकांचा वावर आहे. परंतु या परिस्थितीमुळे त्यांची प्रचंड गैरसोय होते. या गेटने जुने शहादा रोडवरील रहिवासी तसेच दाऊळ, मंदाणे, झोटवाडे, साहुर, शेंदवाडे, जुने कोरदे, नवे कोरदे, लंघाणे व तावखेडा येथील जनतेचा वावर आहे. रेल्वे गेट बंदमुळे त्यांना ताटकळत रहावे लागते. चार-पाच गावातील शालेय विद्यार्थ्यांच्या बसदेखील याच मार्गाने येतात. मात्र गेट बंदमुळे विद्यार्थी शाळेत उशीरा पोहचत असल्यानेही त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने हे गेट कायमचे बंद करून पर्यायी रस्ता म्हणून अमरावती नदीच्या कोप-याजवळ बोगदा तयार करून जुन्या शहादा रोडसाठी पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्यावा. अन्यथा भविष्यात उग्र स्वरुपाचे आंदोलन उभे करण्यात येईल. त्यावेळी होणाºया परिणामांना रेल्वे प्रशासन स्वत: जबाबदार राहील, असे निवेदनात नमूद केले आहे. या आंदोलनात पं.स. सदस्य शानाभाऊ सोनवणे, दाऊळचे उपसरपंच नरेंद्र भामरे, किरण पवार, भैय्या कोळी, संग्राम ठाकरे, गुलाब निकम, सुनील मगर, कुणाल माळी, दिगंबर माळी, लोटन देसले, कैलास ठाकूर, अनिल वाघ, संदीप भोई, शैलेश सोनार आदीसह कार्यकर्ते बहुसंख्येने सहभागी झाले होते.