धुळे : यंदाच्या पोलिस भरती प्रक्रियेत ट्रान्सजेंडर उमेदवार चांद सरवर तडवी यांना सामावून घेण्याच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त हाेताच त्यांची मैदानी चाचणी घेण्यात आली आहे. त्यात ते उत्तीर्ण झाल्याने लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. त्यामुळे २ एप्रिल २०२३ रोजी होणाऱ्या परीक्षेत त्यांनाही समाविष्ट केले जाईल, अशी माहिती पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हा पोलिस शिपाई भरती प्रक्रिया २ ते ५ जानेवारी या कालावधीत घेण्यात आली. त्यावेळी ट्रान्सजेंडर उमेदवार चांद सरवर तडवी यांनी ऑनलाइन फार्म भरलेला होता. ते ५ जानेवारी रोजी भरतीकामी उपस्थित होते. परंतु, ट्रान्सजेंडर उमेदवारांच्या संदर्भात कोणत्याही मार्गदर्शक सूचना प्राप्त नसल्याने त्यांना पोलिस भरती प्रक्रियेत सामावून घेण्यात आले नव्हते.
गृह विभागाकडून १४ मार्च रोजी या विषयीची अधिसूचना जारी करण्यात आली. त्यानुसार, ट्रान्सजेंडर उमेदवारांची १७ मार्च रोजी सकाळी ७ वाजता पोलिस कवायत मैदानावर निवड चाचणी घेण्यात आली. महिला की पुरुष अशी वर्गवारी विचारल्यावर महिला सांगितल्याने त्यानुसार मैदानी चाचणी घेण्यात आली. एकूण ४२ पदांसाठी ५०५ जणांची अंतिम निवड करण्यात आली आहे. २ एप्रिल रोजी हे सर्व उमेदवार लेखी परीक्षा देणार आहेत.