धुळे - ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात माय-लेकी ठार झाल्या. हा अपघात १७ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावरील हाडाखेड तपासणी नाक्याजवळ झाला. अपघातानंतर चालक फरार झाला. याप्रकरणी शिरपूर तालुका पोलिसात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
सायमल रेमसिंग डावर (वय ३६, रा. मडगाव, सेंधवा, जि. बडवानी) हे पत्नी ललिता डावर (वय ३२) व मुलगी खुशी (वय ३) यांच्यासोबत दुचाकीने (क्र. एमपी ४६-एम. डब्ल्यू. ९०५४) शिरपूरकडून सेंधव्याकडे जात होते. त्याचवेळी हाडाखेड तपासणी नाक्याजवळ मागून येणाऱ्या ट्रकने (क्र. केए ५९-०६७२) दुचाकीला जोरात धडक दिली. यात ललिता डावर व खुशी डावर या गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी शिरपूर येथील कॅाटेज हॅास्पिटलमध्ये दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून मायलेकीला मृत घोषित केले. याप्रकरणी सायमल डावर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरपूर तालुका पोलिस स्टेशनला ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक मंगला पवार करीत आहेत.