लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : माल विक्रीवरील खर्च कमी करा यासह अन्य मागण्यांसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापाऱ्यांनी मंगळवारी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारल्यानंतर बुधवारी नेहमीप्रमाणे कामकाजाला सुरुवात झाली़ धान्यसह भुईमूग आणि कांद्याची खरेदी विक्री झाल्याने सुमारे दीड कोटींची आर्थिक उलाढाल झाल्याची माहिती खान्देश व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विजय चिंचोले यांनी दिली़केंद्र सरकारने बाजार समिती बाहेर माल विक्रीला खर्चातून सुट दिलेली असताना बाजार समितीतील व्यवहारांवर मात्र विविध प्रकारचे खर्च लावल्याने बाजार समितीतील व्यापारी आर्थिक अडचणीत येणार असल्याने माल विक्रीवरील खर्च कमी करावा, अशी मागणी बाजार समितीतील व्यापारी संघटनांनी केली होती़ या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी एक दिवसांचा लाक्षणिक संप पाळला होता़ धुळ्यातील बाजार समितीत भाजीपाला आणि गुरांचा बाजार वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते़ त्यामुळे बाजार समितीत शुकशुकाट होता़बुधवारी वर्दळ वाढलीखान्देश व्यापारी संघटनेच्यावतीने एका दिवसासाठी बंद पाळण्यात आल्यामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले होते़ २ कोटींचा नाहक सहन करण्याची वेळ आली असलीतरी बुधवारी सकाळी भाजीपाल्याची उलाढाल झाली़ त्यानंतर धान्य, भुईमूग आणि कांद्याची मोठ्या प्रमाणावर उलाढाल झाल्यामुळे हा आकडा एका दिवसात सुमारे दीड कोटींपर्यंत पोहचला होता़ मंगळवारी दिवसभर शुकशुकाट असलीतरी त्याची भर बुधवारी निघून गेली़ बाजार समितीच्या आवारात दिवसभर गजबज होती़ ट्रकांसह लहान मोठ्या वाहनांची देखील दिवसभर वर्दळ सुरु होती़
‘बंद’नंतर दीड कोटींची उलाढाल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 7:43 PM