धुळे : कोयत्याचा धाक दाखवून रोख रकमेसह मोबाइल आणि अन्य साहित्य घेऊन दोघांनी पळ काढला. नागपूर - सुरत राष्ट्रीय महामार्गावर कुसुंबानजीक गुजरातच्या दिशेने पळ काढत असतानाच दोघांना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले. पकडण्यात आलेले दोघेही अट्टल गुन्हेगार असून, विविध पोलिस ठाण्यांत त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. अकबर अली केसर अली शाह (वय ३०, रा. शब्बीरनगर, चाळीसगाव रोड, धुळे) आणि नईम इसाक पिंजारी (वय ३५, रा. अलहेरा हायस्कूलजवळ, जामचा मळा, धुळे) अशी त्यांची नावे आहेत.
धुळे शहरातील बारा पत्थर चौकात एका गॅरेजजवळ दीपक शिवलाल अहिरे (वय ३३, रा. बिलाडी, ता. धुळे) हा तरुण उभा होता. गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास दोन अनोळखी इसम त्याच्याजवळ आले. काही कारण नसताना शिवीगाळ करीत कोयत्याचा धाक दाखविला. १० हजार रुपये रोख आणि अन्य साहित्य घेऊन दुचाकीवरून पळ काढला. या प्रकरणी रात्री शहर पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल होताच तपासाला सुरुवात झाली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार नागपूर - सुरत राष्ट्रीय महामार्गावर कुसुंबा गावाच्या अलीकडे दोन जण संशयितरीत्या उभेे असून, ते गुजरातच्या दिशेने पळून जाण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती मिळाली. त्यानंतर त्वरित पथकाला रवाना करण्यात आले. पहाटेच्या सुमारास सापळा लावून दोघांना पकडले. त्यांची विचारपूस केली असता सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी लूट केली असल्याची कबुली दिली.पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील, कर्मचारी अशोक पाटील, संदीप सरग, कुणाल पानपाटील, उमेश पवार, रविकिरण राठोड, विशाल पाटील, महेश मराठे यांनी कारवाई केली.
दोन गुन्ह्यांची उकलदोघा अट्टल चोरट्यांनी यापूर्वी धुळे शहर आणि धुळे तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत केलेली जबरी चोरी, घरफोडी अशा गुन्ह्यांची उकल झाली आहे.