धुळे : धुळ्यातील स्वर्ण पॅलेस या सोने चांदीच्या दुकानात चोरट्यांनी हातसफाई करून सुमारे ८९ लाखांचा ऐवज लंपास केल्याप्रकरणाचा उलगडा तब्बल २० दिवसानंतर करण्यात आझादनगर पोलिसांना यश आले.
चोरीची ही घटना ९ जुलै रोजी पहाटे घडली होती. किशोरसिंग रामसिंग टाक (वय २५, रा. गुरुगोविंद नगर, शिवाजी नगरजवळ, जालना) आणि त्याचा दुसरा साथीदार झोनसिंग ऊर्फ लकी जीवनसिंग जुन्नी (वय २८, रा. नवनाथ मंदिराजवळ, हरिविठ्ठल नगर, जळगाव) या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी सोने-चांदीचे दागिने आणि दुचाकी असा एकूण १ लाख ७२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चोरीप्रकरणातील मुख्य तिसरा आरोपी हा फरार आहे. त्याचा तपास सुरू आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांच्या मार्गदर्शनाखाली आझाद नगर पोलिस निरीक्षक नितीन देशमुख, सहायक पोलिस निरीक्षक संदिप पाटील आणि पथकाने केली.