देवेंद्र पाठक, धुळे : हळदीच्या कार्यक्रमात डीजेवर गाणे वाजवू नका, या कारणावरून दोघाजणांना मारहाण करण्यात आली. ही घटना शनिवारी रात्री दोंडाईचा गावात घडली. या प्रकरणी रविवारी सकाळी दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला. भूषण माधवराव गवळे (वय २८, रा. डाबरी घरकुल, दोंडाईचा) या तरुणाने फिर्याद दाखल केली.
त्यानुसार, दोंडाईचा शहरातील आंबेडकर चौक येथे शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास हळदीचा कार्यक्रम सुरू होता. त्यावेळी डीजेवर गाणे वाजविले जात होते. गाणे वाजवू नका असे सांगत दाेघेजण चौकात आले. त्यांनी गाणे सुरू असताना विरोध दर्शविला. यावेळी त्यांच्यात वादही झाला. वादाचे पडसाद शिवीगाळीसह हाणामारीत झाले. हाताबुक्क्यांनी मारहाण करत असताना एकाने सोबत आणलेल्या तलवारीने हल्ला केल्याने भूषण माधव गवळे आणि सचदेव रवींद्र गवळे (रा. डाबरी घरकुल, दोंडाईचा) यांना गंभीर स्वरूपाची दुखापत झाली. यावेळी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमा झाली होती. हाणामारीत जखमी झाल्याने दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच दोेंडाईचा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी वातावरण तणावपूर्ण झाले होते.
या प्रकरणी रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास दोंडाईचा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाल्याने दोघाजणांविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक दिनेश मोरे करीत आहेत.