राजेंद्र शर्मा
धुळे - शिरपूर तालुक्यातील रोहिणी गावात एलसीबीने आणि धुळे तालुक्यातील आर्वी गावात धुळे तालुका पोलिसांनी छापा टाकून दोन जणांना अटक केली. त्यांच्याकडून प्रत्येकी गावठी कट्ट्यासह चार जिवंत काडतुसे जप्त केली.
राेहिणी, ता. शिरपूर येथील घटना शिरपूर तालुक्यातील रोहिणी गावात देशी बनावटीचा कट्टा स्वत: जवळ बाळगून एक तरुण एका घराजवळ उभा असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. माहिती मिळताच पथकाने धाव घेतली असता एका घराजवळ एक जण संशयितरीत्या उभा असल्याचे दिसून आले. त्याला नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव रवींद्र भगवान भिल (वय ३७, रा. रोहिणी, ता. शिरपूर) असे सांगितले. त्याला ताब्यात घेऊन चाैकशी केली असता त्याने त्याच्या घरातील पहिल्या रूममधील पत्रटी पेटीमध्ये लपवून ठेवलेला गावठी कट्टा काढून दिला. सदर गावठी कट्टा पाहता त्यात २ जिवंत काडतुसे असल्याचे पोलिसांच्या तपासातून समाेर आले. पोलिसांनी २५ हजारांचा गावठी कट्टा आणि २ हजार रुपयांची दोन जिवंत काडतुसे, असा २७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आर्वी, ता. धुळे येथील घटना
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातील आर्वी शिवारातील चाैकात मुजाहिद अहमद निसार अहमद (वय ३३, रा. देविका मल्ला, आदमनगर, मालेगाव) हा फिरत असून त्याच्याकडे गावठी कट्टा असल्याची गाेपनीय माहिती तालुका पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाली. माहिती मिळताच तालुका पोलिसांच्या पथकाने सापळा लावून मुजाहिद याला पकडले. त्याची चौकशी आणि अंगझडती घेतली असता त्याच्याकडे २५ हजारांचा गावठी कट्टा आणि २ हजारांची दोन जिवंत काडतुसे, असा २७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पोलिस निरीक्षक हेमंत पाटील व पथकातील बाळासाहेब सूर्यवंशी, संजय पाटील, दिलीप खोंडे, धनंजय मोरे, संदीप सरग, संतोष हिरे, प्रकाश सोनार, किशोर पाटील, मयूर पाटील, योगेश जगताप, कैलास महाजन आणि तालुका पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे व पथकातील अनिल महाजन, महादेव गुट्टे, प्रवीण पाटील, रवींद्र राजपूत, कुणाल पानपाटील, उमेश पवार, मुकेश पवार, राकेश मोरे, रवींद्र सोनवणे, अमोल कापसे, कुणल शिंगाणे, धीरज सांगळे, कांतीलाल शिरसाठ, प्रमोद पाटील, नितीन दिवसे यांनी कारवाई केली.