धुळे : साक्री तालुक्यातील कळंबीर आणि गंगापूरजवळ झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झालेला आहे. या दोन्ही घटनांची नोंद साक्री पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
साक्री तालुक्यातील कळंबीर येथील चैत्राम बळीराम थोरात (४२) हा दुचाकीवरून (एमएच १८ बीजे ६७९५) येत होता. साक्रीकडून येणाऱ्या अज्ञात भरधाव वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघाताची ही घटना निजामपूर रोडवर कळंबीर गावानजिक गोरक्षनाथ मंदिराजवळ सुभाष पोल्ट्री फार्मपुढे ८ फेब्रुवारी रोजी रात्री सव्वाबारा वाजेच्या सुमारास घडली. अपघाताला जबाबदार असणाऱ्या अज्ञात वाहनचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. तरुण गंभीर अवस्थेत पडून असल्याचे लक्षात येताच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिस कर्मचारी मयूर चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोमवारी दुपारी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
गंगापूर गावाजवळील घटना
नागपूर -सुरत राष्ट्रीय महामार्गावर साक्री तालुक्यातील गंगापूर गावाजवळ असलेल्या हॉटेल बजरंगजवळ आरजे (४ जीडी ५३०२) आणि मोटारसायकल (एमएच १५ डब्ल्यू ३४५४) यांच्यात धडक झाली. ही घटना १८ फेब्रुवारी रोजी दुपारी १ ते दीड वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात मनोहर भाऊसाहेब झाल्टे (४५, रा. मालपूर, ता. साक्री) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी चेतन चंद्रकांत झाल्टे (२३, रा. मालपूर, ता. साक्री) याने सोमवारी दुपारी ४ वाजता साक्री पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार फरार ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला.