धुळे : दोन वेगवेगळ्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. धुळ्यानजीक वरखेडी उड्डाणपुलाजवळ एक घटना तर दुसरी घटना नरडाणा गावाजवळ घडली. याप्रकरणी पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली.
धुळ्यानजीक घटनामांगीलाल सखाराम पवार (वय ३५, रा. बडवानी, मध्य प्रदेश) हा तरुण मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील वरखेडी उड्डाणपुलावर सोमवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास पायी जात होता. त्याच वेळेस भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीने त्याला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात त्याला गंभीर दुखापत झाली. डोक्याला अधिक मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर दुचाकीस्वार घटनास्थळावरून पसार झाला. तरुणाला हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. डाॅक्टरांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी मयत तरुणाचे वडील सखाराम पवार यांच्या फिर्यादीवरून आझादनगर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली. घटनेचा तपास पोलिस कर्मचारी तुषार जाधव करीत आहेत.
नरडाणाजवळील घटनामुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर नरडाणा पोलिस ठाण्यासमोर भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत नरडाण्यातील दुचाकीस्वार तरुण ठार झाला. अनुज जगदीशसिंग चव्हाण (रा. नरडाणा, ता. शिंदखेडा) असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शनिवारी रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास एमपी ४४ एमके ३३८८ या दुचाकीने कामावरून त्यांच्या रूमवर जात होते. त्यादरम्यान त्यांना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या एका दुचाकीने जोरदार धडक दिली. त्यात अनुज चव्हाण यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना नरडाणा पोलिसांनी हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. नरडाणा पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली.