लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शस्त्र विक्रीसाठी येणा-यास पोलिसांनी सापळा रचून पकडले. त्याच्याजवळून २० हजार रूपये किंमतीचे दोन गावठी कट्टे, ३० हजार रूपये किंमतीची दुचाकी असा ५० हजाराचा ऐवज जप्त केला. या प्रकरणातील एकजण फरार झाला. ही कारवाई शिरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत हाडाखेड टोल नाक्याजवळ आज सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास करण्यात आली.शिरपूर तालुक्यातून दोनजण शस्त्र विक्रीसाठी धुळ्याकडे येत असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांच्या पथकातील अवैध अग्निशस्त्र विशेष मोहीम पथकातील पोलीस कॉन्स्टेबल राहूल सानप यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी हाडाखेड टोल नाक्याजवळ सापळा रचला.सायंकाळी विजय रमेश पावरा (रा. दुरबळ्या ता.शिरपूर) याच्यासह अन्य एकजण दुचाकीवर (क्र. एमएच १८-अे.आर.१४३६) हे येतांना दिसले. पोलिसांनी विजय पावरा याची झडती घेतली असता, त्याच्याजवळ दोन गावठी पिस्तुल आढळून आले. पोलिसांनी पिस्तुल, दुचाकीसह आरोपीस ताब्यात घेतले. तर दुसरा आरोपी घटनास्थळावरून फरार होण्यात यशस्वी झाला. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम.रामकुमार व अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूरचे सहायक पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, हेड कॉन्स्टेबल योगेश शिरसाठ, राहूल सानप, संजय जाधव, मच्छिंद्र पाटील, संजीव जाधव, योगेश दाभाड, राजीव गिते, यांच्या पथकाने केली. या प्रकरणी हेड कॉन्स्टेबल योगेश शिरसाठ यांनी शिरपूर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.