धुळे : दोन वेगवेगळ्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. एक घटना शिरपूर तालुक्यातील सावळदे फाटा आणि साक्री तालुक्यातील काळीखेत शिवारात घडली आहे. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली.
सावळदे फाट्यावरील घटनामुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिरपूर तालुक्यातील सावळदे गावाजवळील निम्स कॉलेजच्या बस थांब्याजवळ एमपी ०९ एचएच ५९७४ क्रमांकाचा मालट्रक आणि एमएच १९ डीएन ०३०२ क्रमांकाची दुचाकी यांच्यात अपघात झाला. ही घटना बुधवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात देवेंद्र शिवाजी पाटील (वय ३३, रा. आदर्शनगर, शिरपूर) याला गंभीर दुखापत झाली. दुचाकीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अपघाताला जबाबदार असणारा ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला. जखमी अवस्थेत देवेंद्र पाटील याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. पोलिस उपनिरीक्षक गणेश कुटे घटनेचा तपास करीत आहेत.
काळीखेत शिवारातील घटनाभरधाव वेगाने येणारी एमएच ०२ बीजे ४६६६ क्रमांकाची कार आणि एमएच १५ सीटी ६०१६ क्रमांकाची रिक्षा यांच्यात साक्री तालुक्यातील पिंपळनेरनजीक काळीखेत शिवाराजवळ अपघात झाला. ही घटना ८ फेब्रुवारी रोजी सकाळी पावणे अकरा वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात रिक्षा उलटल्याने रिक्षाचालक रतिलाल साबळे आणि रिक्षेतील प्रवासी वामन वेडू चाैधरी (वय २७, रा. देवडीपाडा, ता. साक्री) या दोघांना गंभीर दुखापत झाली. अपघाताला जबाबदार असणारा कारचालक घटनास्थळावरून पसार झाला. जखमी अवस्थेत दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना वामन चौधरी या तरुणाचा मृत्यू झाला, तर रतिलाल साबळे याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सुकलाल बन्या चौरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फरार कारचालकाविरोधात बुधवारी सायंकाळी ७ वाजता गुन्हा दाखल झाला. घटनेचा तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल एम. पी. शिरसाठ करीत आहेत.