धुळे : शिरपूर तालुक्यातील बोरमळी आणि वाडी या गावी दोन वेगवेगळ्या घटनेत दोघांनी विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. शिरपूर तालुक्यातील बोरमळी येथील रेवती भावसिंग पावरा (वय १७) या अल्पवयीन मुलीने तिचे आई-वडील शेतात कामाला गेलेले असताना घरातच काहीतरी विषारी औषध घेतले. हा प्रकार तिच्या लहान बहिणीने शेतात जाऊन वडिलांना सांगितला. त्यानंतर धावतच वडील घरी आले. त्यांनी या मुलीला तातडीने शिरपूर येथील ग्रामीण रुग्णालयात खासगी वाहनाने उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी धुळ्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना सोमवारी तिचा मृत्यू झाला. शिरपूर तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संदीप पाटील करीत आहेत.
दुसरी घटना शिरपूर तालुक्यातील वाडी येथील मुनाफ अब्दुल पटेल (वय ५१) या इसमाने काहीतरी विषारी औषध घेतल्याने त्याला पुतण्या हमीद पटेल याने उपचारार्थ शिरपूर रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. घटनेचा तपास पोलिस नाईक पवार करीत आहेत.