धुळे : शौचास गेलेल्या दोन मित्रांना चाकू आणि विळ्याचा धाक दाखवून लुटल्याची घटना अवधान शिवारात शनिवारी रात्री १०:०० वाजता घडली. चोरट्यांनी दोघांजवळून ४३ हजारांचा ऐवज लुटून नेला. याप्रकरणी मोहाडी पोलिस ठाण्यात चार अनोळखी तरुणांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा रविवारी रात्री साडेनऊ वाजता दाखल झाला.
अवधान येथील निंबा नगरात राहणारा अजय दशरथ फुलपगारे (वय २६) या तरुणाने मोहाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, मुंबई - आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील अवधान शिवारात नागपूर - सुरत बायपास महामार्गाच्या कच्च्या रस्त्यावर अजय फुलपगारे व किशोर पवार हे दोघे शौचास गेले होते. शनिवारी रात्री १०:०० वाजेच्या सुमारास त्यांच्याजवळ १८ ते २४ वयाेगटातील अनोळखी चार तरुण आले. तीन जणांनी अंगात काळ्या रंगाचे कपडे आणि तोंडाला काळ्या रंगाचा रुमाल लावले होते. त्यांनी दोघांना शिविगाळ करत चाकू आणि विळ्याचा धाक दाखवत मारण्याची धमकी दिली. तुमच्याजवळ काय आहे ते काढा, असे सांगत दम भरला.
चोरट्यांनी अजय फुलपगारेजवळील २६ हजार रुपये रोख, २ हजार ५०० रुपयांची चांदीची चेन, १ हजार ५०० रुपयांचा मोबाइल, तसेच किशाेर पवार याच्याकडील १० हजार रुपये रोख, ३ हजाराचा मोबाइल असा एकूण ४३ हजारांचा दोघांकडील ऐवज बळजबरीने लुटून घेत चाैघांनी पोबारा केला. या घटनेनंतर दोघे तरुण घाबरून गेले. त्यांनी मोहाडी पोलिस ठाणे गाठले आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानुसार रविवारी रात्री साडेनऊ वाजता भादंवि कलम ३९२, ३४ प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक हेमंत राऊत घटनेचा तपास करत आहेत.