धुळे : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने देवपूर येथील एका महिलेची सोनपोत लांबविल्याची घटना रविवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी सायंकाळी उशिरा देवपूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवपूर येथील विघ्नहर्ता कॉलनीतील रहिवासी मनिषा मनेष भांडारकर (४१) या रविवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास देवपुरातील बडगुजर कॉलनी भागातून पायी जात होत्या. यावेळी दोन व्यक्ती काळ्या रंगाच्या दुचाकीवरुन त्यांच्या पाठीमागून आल्या. त्यापैकी मागे बसणाऱ्या व्यक्तीने पत्ता विचारण्याचा बहाणा करुन मनिषा यांच्या गळ्यातील सोन्याची मंगलपोत जबरदस्तीने हिसकावून घेतली. त्यानंतर हे दोन्ही दुचाकीस्वार क्षणार्धात फरार झाले. मनिषा यांच्या म्हणण्यानुसार या दोन्ही व्यक्ती अंदाजे २० ते २५ वयोगटातील असाव्यात तसेच पुढे बसणाऱ्या व्यक्तीने काळ्या रंगाचे जॅकेट, भुरकट रंगाची पॅन्ट तसेच पाठीला काळ्या रंगाची बॅग लावलेली होती. तर मागे बसलेल्या व्यक्तीने गुलाबी शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट घातली होती. मनिषा भांडारकर यांच्या तक्रारीवरुन दोघा अज्ञातांविरुध्द देवपूर पोलीस स्थानकात भादंवि कलम ३९२, ३४प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास हेडकॉन्स्टेबल आय. एन. ईशी करत आहेत.दरम्यान, चेन स्नॅचिंगच्या घटनांनी आता पुन्हा डोके वर काढले असून, यापूवीर्ही देवपूर परिसरात अशाच घटना घडल्या आहेत. साहजिकच यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
पत्ता विचारण्याचा बहाणा करुन महिलेची सोनपोत लांबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 10:55 PM