धुळे : ओव्हरटेक करत भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात अवधान गावातील रमेश लोटन भदाणे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची ही घटना शनिवारी सायंकाळी उशिरा घडली. गावकऱ्यांनी ट्रकचालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले असून चालकाला अटक करण्यात आली.
मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातील अवधान शिवारात रस्त्याच्या बाजूला दुचाकीसह (एमएच ४८ बीके ३१४२) अवधान गावातील रमेश लोटन भदाणे हे उभे होते. शनिवारी सायंकाळच्या सुमारास ट्रक (जीजे १२ बीएक्स ८७४१) मालेगावकडून धुळ्याच्या दिशेने भरधाव वेगाने आला. ट्रक ओव्हरटेक करीत असताना उभ्या दुचाकीला जोरदार धडक बसली. यात दुचाकीसह रमेश भदाणे हे दूरवर फेकले गेले. त्यांच्या डोक्याला आणि शरीराच्या अन्य ठिकाणी गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यांना तातडीने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.
अपघातानंतर अवधान येथील नागरिकांनी महामार्गावर गर्दी केली होती. परिणामी सायंकाळी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. ट्रकचालकाला अडविण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच मोहाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रकचालकाला ताब्यात घेतले. याप्रकरणी सागर रामहरी भदाणे (वय ३३, रा. अवधान, ता. धुळे) याने दिलेल्या फिर्यादीवरून ट्रकचालक मोनू कुमार अंबालाल मीना (वय २६, रा. मालकाखेडा, जहाजपूर, जि. भिलवाडा, राजस्थान) याला अटक करण्यात आली. पोलिस हेड कॉन्स्टेबल के. सी. चौधरी घटनेचा तपास करीत आहेत.