लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे त्यांना श्रध्दांजली अर्पन करून महापालिकेची सोमवारी आयोजित महासभा तहकूब करण्यात आली़ यावेळी सर्वपक्षीय सदस्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्याबद्दल मनोगत व्यक्त केले़ महापालिकेची सर्वसाधारण महासभा नवीन इमारतीतील सभागृहात सोमवारी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली होती़ महासभेला महापौर कल्पना महाले, आयुक्त सुधाकर देशमुख, उपमहापौर उमेर अन्सारी, प्ऱ नगरसचिव मनोज वाघ यांच्यासह सदस्य, अधिकारी उपस्थित होते़ महासभेच्या सुरूवातीला स्व़ अटल बिहारी वाजपेयी, क्रिकेटपटू अजित वाडेकर, पद्मश्री सुवालाल बाफना व केरळमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीतील मृतांना सामुहिक श्रध्दांजली अर्पन करण्यात आली़ यावेळी उपमहापौर उमेर अन्सारी, भाजपच्या गटनेत्या प्रतिभा चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते कमलेश देवरे, सोनल शिंदे, अमोल मासुळे यांनी शोकप्रस्ताव मांडत महासभा तहकूब करण्याची विनंती महापौरांना केली़ त्यानंतर अमोल मासुळे, प्रतिभा चौधरी, ईस्माईल पठाण, नरेंद्र परदेशी, संजय गुजराथी, साबीर सैय्यद मोतेबर, फिरोज शेख यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनकार्याविषयी माहिती दिली़ कोणताही भेदभाव न करता वाजपेयी यांनी केलेल्या कार्यामुळे देशवासियांना त्यांचा अभिमान होता, आहे व राहील अशा भावना सर्वपक्षीय नगरसेवकांनी व्यक्त केल्या़ वाजपेयी यांच्या जीवनातील विविध प्रसंगांवर प्रकाश टाकत त्यांच्या कवितांनाही उजाळा देण्यात आला़ अखेर महापौर कल्पना महाले यांनी महासभा तहकूब करण्यात येत असल्याचे जाहीर करून सभा २७ आॅगस्टला होईल, असे स्पष्ट केले़
वाजपेयींना श्रध्दांजली वाहून महासभा तहकूब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 7:03 PM
धुळे महापालिका, २७ आॅगस्टला आयोजन
ठळक मुद्दे-सर्वपक्षीय नगरसेवकांची वाजपेयींना श्रध्दांजली- वाजपेयींच्या जीवनकार्यावर प्रकाश-२७ आॅगस्टला होणार महासभा