धुळे :- सुरत नागपुर महामार्ग क्रमांक ६ वर धुळे ते नेर पर्यंत सर्विस रोड करण्यात यावा, तसेच महामार्गा लगतच्या गावांना सुविधा मिळाव्यात याची वारंवार मागणी करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी रविवारी रखरखत्या उन्हात रविवारी आनंदखेडे (ता. धुळे) येथे सुमारे एकतास आंदोलन करण्यात आले. यामुळे महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. अखेर महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना आंदोलनस्थळी येऊन मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. धुळे जिल्हा परिषदेचे सदस्य संग्राम पाटील यांच्या नेतृत्वात हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
सुरत नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. धुळे शहरापासून ते नेर गावापर्यंत या महामार्गाच्या दोन्ही बाजूला व शेतकऱ्यांच्या शेतात जाण्यासाठी सर्विस रोड तयार करण्यात यावे तसेच आनंदखेडा, कुंडाणे, उडाणे,गोताने, सांजोरी, मोराणे,कुसुंबा इत्यादी गावाजवळ मोठे सर्कल तयार करण्यात यावे अशी मागणी शेतकरी व गावकऱ्यांनी राष्ट्रीय राजमार्ग प्राधीकरणकडे केली होती. मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नागरिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने रविवारी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचा विरोधात निषेध करत ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. सुमारे एक तासाहून अधिक सुरू असलेल्या या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. यावेळी पोलिसांचा मोठा फौज फाटा देखील तैनात करण्यात आला होता.