दोंडाईचा - श्रीराम जयंती व महावीर जयंती मोठ्या उत्साहाने व शांततेत पार पडले. त्याच पद्धतीने आगामी काळात येणारी महात्मा फुले जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रमजान ईद आदी सण- उत्सव कायद्याचे भान ठेवून शांततेत साजरे करा. या सण-उत्सवांच्या कालावधीत जो कोणी शांततेचा भंग करेल, त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा दोंडाईचा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांनी शनिवारी शांतता कमिटीच्या बैठकीत दिला.
आगामी सण- उत्सवांच्या पार्श्वभूमीवर दोंडाईचा पोलिस प्रशासनातर्फे पोलिस स्टेशनच्या परिसरात शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी श्रीराम पवार यांनी बैठकीत मार्गदर्शन केले. बैठकीला पोलिस उपनिरीक्षक सचिन गायकवाड, शरद लेंडे, हेमंत खैरनार तसेच शहरातील विविध समाजातील नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते.
यापुढे श्रीराम पवार यांनी कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची याची काळजी घ्या. पदाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त स्वयंसेवक नेमावे, विविध धर्मातील एकोपा तात्पुरता नसता, तो कायम असावा. जो कायद्यात राहील तोच फायद्यात राहील, जो चुकीचे काम करेल, शांतता भंग करेल, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. तसेच या कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी एक वही, पेन अर्पण केल्यास ते शैक्षिणक साहित्य गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहाेचवून त्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्याचे आवाहनही पवार यांनी केले.
रात्री दहा नंतर सर्व दुकाने बंद करावीत..शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी सर्व व्यावसायिकांनी रात्री दहानंतर दुकाने बंद करण्याचे आवाहनही पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांनी या बैठकीत केले. रात्री दारू पिऊन अनेक तरुण कायदा- सुव्यवस्था बिघडवण्याच्या प्रयत्न करतात, त्यांचाही पोलिसांतर्फे बंदोबस्त केला जाणार असून, मोटरसायकल रॅली काढताना हेल्मेटचा वापर करण्याचे आवाहनही पवार यांनी केले.