धुळे : शेत नांगरणीच्या पैशांवरून झालेल्या वादाचे पडसाद हाणामारीत झाले. गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. ही घटना साक्री तालुक्यातील विटाई-बेहेड रस्त्यावर बुधवारी रात्री १० वाजता घडली. यात ललित अशोक खैरनार (वय २८, रा. विटाई ता. साक्री) या तरुणाचा गुरुवारी मृत्यू झाला. याप्रकरणी संशयित मुकुंदा गुलाबराव पाटील (तोरवणे) (वय ४८, रा. बेहेड ता. साक्री) याच्या विरोधात वाढीव कलमानुसार साक्री पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला.
मयत तरुणाचे वडील अशोक खैरनार (वय ५५) यांनी साक्री पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, शेत नांगरणीच्या बाकी राहिलेल्या पैशांवरून हॉटेल आठवणचा मालक मुकुंदा गुलाबराव पाटील (तोरवणे) याने ललित याच्याशी वाद घातला. बुधवारी रात्री ललित याला हाॅटेलवर बोलावून घेण्यात आले. मुकुंदा पाटील याने ललित याच्याशी पुन्हा वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद विकोपाला जात त्याने ललितवर सेंट्रिंग कामाच्या लोखंडी पहारने बेदम वार केला. यात त्याच्या पायाला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी साक्री पोलिस ठाण्यात मारहाणीची नोंद करण्यात आली. ललित याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. याप्रकरणी मुकुंदा पाटील याच्याविरोधात वाढीव कलमानुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित मुकुंदा गुलाबराव पाटील (तोरवणे) याला अटक करण्यात आली.