लोकमत आॅनलाईन धुळे - महापालिकेच्या प्रभाग १८ मधील मोहाडी उपनगर परिसरात दुपार १ वाजेपर्यंत मतदानासाठी अनुत्साह जाणवला. मात्र त्यानंतर मतदारांची गर्दी होऊन रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास मनपा आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सुधाकर देशमुख यांनी मतदान केंद्रास भेट देऊन प्रक्रियेची पाहणी करून माहिती घेतली. मोहाडी उपनगर हा राष्टÑवादी कॉँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. परंतु यावेळी भारतीय जनता पक्षाने आव्हान उभे केल्याने मोठी चुरस निर्माण झाल्याचे पहावयास मिळाले. एरव्ही सकाळी मजूर व नोकरदार वर्गाच्या मतदानासाठी रांगा लागतात. मात्र यावेळी प्रथमच सकाळी एवढा शुकशुकाट जाणवल्याचे तेथील जाणकारांनी सांगितले. श्री पिंपळादेवी माध्यमिक विद्यालयात मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास या केंद्रावर फेरफटका मारला असता तुरळक मतदार दिसून आले. सकाळी तर शुकशुकाट दिसून आला. मात्र साडेआठ-नऊ वाजेनंतर मतदारांची तुरळक वर्दळ सुरू झाली. दुपारी साडेबारापर्यंत ‘जैथे थे’ स्थिती होती. त्यातही महिला मतदारांचाच वावर दिसून आला. दुपारी एक वाजेच्या सुमारास मनपा आयुक्त देशमुख यांनी भेट दिली. त्यांच्यासोबत उपायुक्त रवींद्र जाधव होते. त्यांनी मतदान केंद्रांना भेटी देऊन प्रक्रियेबाबत माहिती घेतली. दुपारी दीड वाजेनंतर मात्र मतदान केंद्रांवर गर्दी झाली. छोट्या रांगा लागल्याचे पहावयास मिळाले. विशेषत: महिला मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. उपनगरात शिरताना जलकुंभ असलेल्या परिसरात विविध राजकीय पक्षांचे बुथ दिसले. तेथे मतदारांपेक्षा कार्यकर्त्यांचीच जास्त गर्दी दिसून आली. मात्र मतदान केंद्रांच्या परिसरात विविध पक्षांचे कार्यकर्ते, बंदोबस्तावर तैनात पोलीस यांचीच मोठी गर्दी दिसत होती. दुपारी १ वाजेनंतर लागल्या रांगा मोहाडी उपनगरातील मतदान केंद्रांवर दुपारी १ वाजेनंतर मतदारांची गर्दी होण्यास सुरूवात झाली. त्यातही महिला मतदारांची संख्या लक्षणीय दिसून आली. येथील मतदान केंद्र संवेदनशील असल्याने तुलनेते जास्त फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला आहे.