धुळे : जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतीच्या प्रत्येकी एका जागेसाठी व शिरपूर तालुक्यातील अंतुर्ली येथील थेट सरपंचपद निवडीसाठी पोटनिवडणूक होत असून, त्यासाठी गुरूवारी मतदान होणार आहे. सदस्यपदासाठी १६ तर सरपंचपदासाठी तीन असे एकूण १९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० यावेळेत मतदान होणार आहे.
विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या जिल्ह्यातील ४७ ग्रामपंचायतीच्या ६१ जागा व थेट सरपंचपदाच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झालेली होती. मात्र ग्रामपंचायतींसाठी कमी कालावधी असल्याने, अनेकांनी ही पोटनिवडणूक लढविण्याकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. ८ मे रोजी अर्ज माघारीनंतर निवडणूकीचे चित्र स्पष्ट झाले. त्यात सदस्यपदाच्या २५ जागा बिनविरोध झाल्या. तर २८ जागांसाठी एकही अर्ज दाखल झालेला नव्हता.
दरम्यान आता धुळे तालुक्यातील सरवड, दह्याणे, धामणगाव,अजनाळे, साक्री तालुक्यातील नवेनगर, सुकापूर, कावठे व शिंदखेडा तालुक्यातील जखाणे येथील प्रत्येकी एका जागेसाठी गुरूवारी मतदान होणार आहे. आठ सदस्यपदासाठी १६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. तर शिरपूर तालुक्यातील अंतुर्ली येथे लोकनियुक्त सरपंचपदासाठी पोटनिवडणूक होत असून, याठिकाणी तीन उमेदवार रिंगणात आहेत.
सदस्य पदासाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी प्रत्येक गावात एक तर अंतुर्ली येथे तीन मतदान केंद्र असतील. १८ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० यावेळेत मतदान होणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर एक मतदान केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी व एक शिपाई अशा पाच कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. १९ मे रोजी सकाळी १० वाजता प्रत्येक तालुक्याच्या तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे.