जैताणे : साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरातील सर्वात जास्त लोकसंख्या असणाºया जैताणे गावातील ग्रामस्थांवर उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. येथील नकट्या बंधाºयात ३० ते ३५ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. जैताणे परिसरातील भूजल पातळी कमालीची घसरल्याने पाणीपुरवठ्यासाठी वापरात असणाºया कूपनलिकाही एकापाठोपाठ आटत चालल्या आहेत. ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा विभाग दिवसरात्र परिश्रम घेऊन पाणीपुरवठा करण्यासाठी झटत आहे. आटत जाणाºया कूपनलिकांऐवजी पर्यायी राखीव कूपनलिकांचा वापर करून समस्येवर मात करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. काही कूपनलिकांमधील सबमर्सिबल पंप अधिक खोलवर उतरवून पाणी शोधले जात आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असून पाच ते सहा दिवसांआड नळांना पाणी येत असल्याने वेळप्रसंगी पाण्यासाठी पायपीट करून भटकंती करण्याची वेळ येथील ग्रामस्थांवर ओढवली आहे.परिसरातील जलपातळीचे प्रमुख स्त्रोत असणाºया नकट्या बंधाºयाच्या जलसाठ्यातही झपाट्याने घट होत चालली आहे. आजअखेर फक्त ३० ते ३५ टक्केच जलसाठा या बंधाºयात शिल्लक आहे. त्यात अजून पूर्ण उन्हाळा बाकी आहे. आजच अशी स्थिती असल्याने पुढे काय? असा प्रश्न ग्रामस्थांपुढे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नकट्या बंधाºयाची उंची वाढवण्याची मागणी परिसरातून प्रशासनाकडे व शासनदप्तरी वारंवार करण्यात येऊनही या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. जलसाठा झपाट्याने संपत असल्यामुळे पुन्हा एकदा या मागणीने उचल धरली आहे. लोकप्रतिनिधींनी यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज व्यक्त होत आहे. वीज महावितरण कंपनीच्या मनमानी भारनियमनाचा फटकाही सार्वजनिक पाणीपुरवठ्याला बसत आहे. येथील सरपंच संजय खैरनार यांनी दिलेल्या माहितीनुसार परिसरात भारनियमन बंद करण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरत आहेत. ठरलेल्या भारनियमनाच्या वेळेव्यतिरिक्तही चार-पाच तास वीजपुरवठा खंडित असतो. म्हणून वेळेत कूपनलिकांवरून जलकुंभ भरणे शक्य होत नाही. त्याचा विपरित परिणाम पाणीपुरवठ्याच्या नियमिततेवर होत असल्याची प्रतिक्रिया यादव भदाणे यांनी दिली.
पाण्यासाठी भटकंती
By admin | Published: March 24, 2017 12:23 AM