लोकमत न्यूज नेटवर्कदहिवेल : साक्री शहरासाठी मालणगाव धरणातून जलवाहिनीद्वारे पाणी देण्यास मालणगाव धरणबचाव संघर्ष समितीने विरोध केला आहे. शुक्रवारी मालणगाव येथे झालेल्या समितीच्या बैठकीला परिसरातील १६ गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. मालणगाव धरणाच्या लाभ क्षेत्रातील १६ ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभा बोलावून त्यात धरणातून जलवाहिनीद्वारे साक्री शहराला पाणीपुरवठा करण्यास विरोध करणार प्रस्ताव पारित केला होता. या गावातील सुमारे ५० हजार लोकांनी याला विरोध दर्शविला होता. प्रशासनाला व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, रोहयो मंत्री जयकुमार रावल, खासदार डॉ.हिना गावीत, आमदार डि.एस.अहिरे आणि आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांना यासंदर्भात निवेदनही दिले आहे. समितीच्या शुक्रवारी झालेल्या सभेत येत्या आठ दिवसात सर्व गावांच्या पुन्हा विशेष ग्रामसभा घेऊन या प्रश्नासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. धरण संघर्ष समितीच्या दबावाने २९ नोव्हेंबर रोजी रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यात आले होते. परंतु सातव्या दिवशीच पाटचारी फुटली की कुणाच्या लाभासाठी फोडण्यात आली. यासंदर्भातही बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली.बैठकीस मालणगाव, खरडबारी, सातारपाडा, बोडकीखडी, दहिवेल, भोनगाव, कालदर, किरवाडे, घोडदे, सुरपान, बर्डीपाडा, बोदगाव, आमोडे, छडवेल या गावांचे सरपंच उपस्थित होते.बैठकीच्या अध्यक्षस्थानी वसंतराव बच्छाव होते. तर जि.प.सदस्य प्रभाकर बच्छाव, मधुकर बागुल, माजी सरपंच दत्तात्रय वसंतराव बच्छाव, दत्तात्रय पाटील, देविदास पाटील, हिम्मतराव पाटील, एकनाथ गुरव, भास्कर बच्छाव, दिलीप बच्छाव, कन्हैयालाल माळी, राजेंद्र पाटील, बापू माळी, सुक्राम महाले, सुक्राम ठाकरे, साहेबराव चौधरी, युवराज चौरे, गोविंदा देवरे, पांडू कोकणी, गोरख मालचे, भाऊसाहेब गांगुर्डे, जितेंद्र गवळी, सुधीर मराठे, साहेबराव बिरारीस, सतीष पाटील उपस्थित होते.
मालणगाव धरणाचा पाणीप्रश्न पेटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 10:26 PM