धुळे तालुक्यातील भिरडाणे-भिरडाई गावाची लोकसंख्या १ हजार २८२ असून त्यात पुरुष ६५० तर महिलांची संख्या ६३२ एवढी आहे. गावास यापूर्वी स्वच्छ भारत अभियानांतर्गत हगणदारी मुक्त गाव पुरस्कार मिळाला आहे. गावात प्रत्येक कुटुंबास जलशुद्धीकरण प्रकल्पा (आर.ओ.)द्वारे पाणी दिले जाते. शुद्ध पाण्यामुळे गावातील लोकांच्या आरोग्याबाबत बहुतांश समस्या दूर झाल्या आजाराचे प्रमाण कमी झाले. लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियान योजनेत परिसरात अनेक ठिकाणी व गावालगत नाल्याचे खोलीकरण करून वाहून जाणारे पाणी अडविले. जुन्या माती बंधाऱ्यांचीही दुरुस्ती करून पाणी अडविले आहे. परिणामी गावातील हजारो एकर जमीन सिंचनाखाली आली. त्यामुळे बागायती पिके घेऊन शेतकरी सुखी व समाधानी झाले आहेत. गावातील सांडपाण्यासाठी शोषखड्डे करण्यात आले. त्यात सिमेंटची टाकी ठेवून खड्डयात आजूबाजूला दगड, विटा ठेवून व टाकीवर झाकण ठेवून घरातील सांडपाणी त्यात सोडले. त्यामुळे अनारोग्यास आळा बसला असून विहिरींची पाण्याची पातळी वाढण्यास मोठीच मदत झाली. कार्यक्रमात जि़प़अध्यक्ष शिवाजीराव दहिते यांच्या हस्ते सरंपच रेखा पाटील यांना पुरस्कार देण्यात आला़
सरपंच रेखा पाटील यांना जल व्यवस्थापन पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 5:58 PM