धुळे : गतवर्षी झालेल्या असमाधानकारक पावसामुळे जिल्ह्यात बहुसंख्य गावांना पाणी टंचाईची झळ बसू लागलेली आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने नियोजन करण्यास सुरवात केलेली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाचा निरीक्षण अहवाल आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या सर्वेक्षणानंतर प्रशासनाने टंचाई कृती आराखडा तयार केला आहे. त्यानुसार मार्च ते एप्रिल २०१९ या कालावधीत ५५ गावे व ८९ वाड्यांना पाणी टंचाईची झळ बसू शकते.जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ५३१.६५ मी.मी असून, सप्टेंबर २०१८ अखेरपर्यंत ४०७ मी.मि पावसाची नोंद झालेली आहे. यात सर्वात कमी पाऊस हा शिंदखेडा तालुक्यात झालेला आहे. तेथील पावसाची टक्केवारी ६२.३४ एवढी आहे.दरम्यान असमाधानकारक पाऊस झाल्याने, त्याचा परिणाम जलसाठ्यांवर होऊ लागलेला आहे. पावसाअभावी धरण शंभर टक्के भरू शकली नाहीत. तर अनेक ठिकाणी आतापासूनच विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यात पाणी टंचाई भासण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने तयार केलेल्या नियोजनानुसार मार्च ते एप्रिल २०१९ या दुसऱ्या टप्यात ५५ गावे व ८९ वाड्यांवर पाणी टंचाई जाणवू शकते.दरम्यान शिरपूर तालुक्यात यावर्षी बऱ्यापैकी पाऊस पडलेला असतांनाही जानेवारी ते मार्च या कालावधीत याच तालुक्यातील सर्वाधिक गावे व वाड्यांना पाणी टंचाईची झळ सोसावी लागू शकते. या तालुक्यात ४९ गावे व ७७ वाड्यांवर पाणीटंचाईची संभावना व्यक्त करण्यात आलेली आहे. तर त्याखालोखाल शिंदखेडा तालुक्यातील १० गावांना साक्री तालुक्यातील ११ गावे व ४१ वाड्या व धुळे तालुक्यातील १२ गावे व ० वाडीवर पाणी टंचाईची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.२२९ उपाययोजना प्रस्तावितजानेवारी ते मार्च या कालावधीत जिल्ह्यातील चारही तालुक्यांमध्ये निर्माण होणारी पाणी टंचाईची शक्यता लक्षात घेऊन त्यासाठी २२९ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आलेल्या आहेत. त्यासाठी २ कोटी ३६ लाख ८९ हजाराचा खर्च अपेक्षित आहे. यात विंधनविहिरी, तात्पुरती पुरक योजना, खाजगी विहिरी अधिग्रहित करणे, विहिर खोलीकरण, गाळ काढणे, टॅँकरने पाणी पुरवठा करणे आदी योजना राबवून पाणी टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ७५ खाजगी विहिरी अधिग्रहित करण्याचे प्रस्तावित आहे. तर १८ गावांना टॅँकरने पाणी पुरवठा करावा लागण्याची शक्यता आहे.पाण्याची नासाडीथांबविण्याची गरजजिल्ह्यात अनेकठिकाणी दुष्काळसदृश्य स्थिती आहे. पाण्यासाठी नागरिकांना आतापासूनच वणवण भटकंती करावी लागत आहे. अशी स्थिती असतांना काही ठिकाणी नळ आल्यानंतर अनेकजण गाड्या धुतात, अंगणात वारेमाप पाणी टाकून पाण्याची मोठ्या प्रमाणावर नासाडी करीत असतात. पाण्याची नासाडी करणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई करण्याची गरज आहे. तसेच काही ठिकाणी सार्वजनिक नळांना तोट्या नसल्याने, त्यामुळेही पाणी वाया जात असते. सार्वजनिक नळांना तोट्या बसविण्याचीही गरज निर्माण झालेली आहे.तुलनात्मक अभ्यास होणारवरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांनी जिल्ह्यातील ४५ पाणलोट क्षेत्रातील एकूण १०७ निरीक्षण विहिरींच्या पाणी पातळीचा तुलनात्मक अभ्यास करून जिल्ह्यातील चार तालुक्यात पाणी टंचाईची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.चारा टंचाई केले नियोजनजिल्हयात लहान -मोठ्या गुरांची एकूण संख्या ६ लाख ९९ हजार ६९४ एवढी आहे. यावर्षी खरीपात ज्वारीचे अपेक्षित उत्पन्न आलेले नसले तरी, ऐन उन्हाळ्यात गुरांना चाºयाची टंचाई भासू नये यासाठी पशुसंवर्धन विभागानेही नियोजन केले आहे.जिल्ह्यात सध्या ३ लाख २७ हजार ८१४ मेट्रीक टन चारा असून, तो मार्च २०१९ अखेरपर्यंत पुरू शकणार आहे. रब्बीमध्ये केलेल्या पेरणीतूनही चारा उपलब्ध होऊ शकणार असल्याचे सांगण्यात आले.उन्हाळ्यात संभाव्य चारा टंचाई लक्षात घेता संबंधित विभागाने त्याचेही नियोजन केलेले आहे. त्यामुळे गुरांच्या चाºयाची टंचाई भासणार नाही, असा पशुसंवर्धन विभागाचा दावा आहे.