गेल्या महिन्यात ताप, सर्दी, खोकला आदी लक्षणे असणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी होती. येथील खासगी दवाखान्यांना यात्रेचे स्वरूप आलेले होते. मृत्युदर प्रथमच वाढला होता. मालपूरच्या इतिहासात प्रथमच मयतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी अमरधामची जागा अपुरी पडत होती.
मालपूरसह परिसरातील खेड्यातदेखील संसर्गाची बाधा पोहचली होती. यात अनेक वयोवृद्धासह तरुणांनादेखील जीवास मुकावे लागले. असे असताना सोमवारी आरोग्य विभागाच्या फिरत्या आर.टी.पी.सी.आर. चाचणी पथकाला अल्प प्रतिसाद मिळाला. कोरोना चाचणी करून घेण्यास अनेक जण टाळाटाळ करतात. कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. यामुळे कोरोना फैलावावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. मालपूरसह परिसरात मे महिन्याच्या अखेरीस कोरोनाला चांगलीच उतरती लागल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्या गावात एकाच अॅक्टिव्ह रुग्णाची नोंद दिसून येत आहे. पुढील काही दिवस पालन केल्यास निश्चित कोरोनापासून सुटका मिळेल.